पावसामुळे पिकांचे कोट्यावधींचे नुकसान; मात्र पंचनामे अद्यापही नाहीत

 crops damaged due to incessant rains nashik marathi news
crops damaged due to incessant rains nashik marathi news

नाशिक/येवला :  गेले दोन ते तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही मका, कांद्यासह बाजरीचे पीक अनेक ठिकाणी पाण्यात असून, कांदे शेतातच सडत आहेत. कांदा रोपांची हीच अवस्था असून, शेतकऱ्यांचे नुकसान कोटींच्या वर आहे. मात्र, पंचनामे अद्यापही सुरू न झाल्याने शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे. 

तालुक्यात १४ तारखेला ५१३ मिलिमीटर पावसाची नोंद होती. आज हाच आकडा ५८७ मिलिमीटर झाला आहे. १६ तारखेला ११ व १७ ला १५ मिलिमीटर पाऊस झाला, तर २० तारखेला धोधो बरसणारा पाऊस तब्बल ३८ मिलिमीटरपर्यंत नोंदवला गेला. रात्रीच्या वेळेस झालेल्या या पावसाने तालुक्याच्या सर्व भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली; पण काही भागात अधिक मुसळधार स्वरूप असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक बंधारे व नद्याही तुडुंब भरून वाहिल्या. देशमाने, मानोरी परिसरात नदीला आलेल्या पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात सुमारे सहा हजार ५०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली असून, यातील सहा हजार हेक्टर कांदा पीक जमिनीतील बुरशी व सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे. 

अतिवृष्टीने सोंगणीला आलेले सोयाबीन, बाजरी पूर्णपणे खराब झाले. लागवड झालेला कांदा पूर्णपणे नष्ट झाला, तर हजारो रुपये खर्च करून खरेदी केलेले कांदा बियाणेही पावसाने नष्ट झाले. सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
-हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना 

दोन दिवस झालेला जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे आमचे तीन एकर मका क्षेत्र भुईसपाट होऊन प्रचंड नुकसान झाले. मका सोंगायलाही महाग होणार आहे. हातातोंडाशी आलेले मका पिकाचे नुकसान बघवत नाही. प्रशासनाकडून अजून पंचनामे झाले नाही. 
-गणेश गुंड, मका उत्पादक, मुखेड 
 
मका पीक पावसाने आडवे पडून सडायला लागले. सोयाबीन पाण्यात पोहत आहे. रोगामुळे कांदा रोप वारंवार टाकून, फवारणी करूनही उतरत नाही. तर लागवड झालेले कांदे मातीत जाताय. पाऊस पाण्यातून टोमॅटो तोडावे कसे, शेताबाहेर आणावे कसे. 
-बापूसाहेब पगारे, शेतकरी संघटना, येवला 

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com