भाऊबीजेला गावाकडे जाणाऱ्या महिलांना त्रास; फेस्टिव्हल विशेष गाड्यांना गर्दी

अंबादास शिंदे
Monday, 16 November 2020

आरक्षण, कोरोनाचे नियम आदींचे पालन करावे लागत आहे. रेल्वे सुरक्षा दल, नाशिक रोड रेल्वे पोलिसांनीही गस्त वाढवली आहे. नेहमीचा गाड्या बंद असल्याने नेहमीच्या प्रवाशांची निराशा झाली आहे. त्यांना खासगी वाहनांनी जास्त पैसे खर्चून जावे लागत आहे.

नाशिक रोड : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला गावाकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्यांना गर्दी वाढली आहे. गोदावरी, राज्यराणी, भुसावळ-पुणे, भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद असल्याने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आरक्षण तिकिटीसाठी गर्दी होत आहे. 

पाडवा आणि भाऊबीजेला गावाकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्यांना गर्दी

राज्यात आंतरजिल्हा प्रवासात मदत ठरणाऱ्या गोदावरी, पंचवटी, राज्यराणी या प्रमुख गाड्या बंद असल्या तरी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आदी राज्यांत जाणाऱ्या गाड्यांना मात्र उत्तम प्रतिसाद आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र आरक्षण, कोरोनाचे नियम आदींचे पालन करावे लागत आहे. रेल्वे सुरक्षा दल, नाशिक रोड रेल्वे पोलिसांनीही गस्त वाढवली आहे. नेहमीचा गाड्या बंद असल्याने नेहमीच्या प्रवाशांची निराशा झाली आहे. त्यांना खासगी वाहनांनी जास्त पैसे खर्चून जावे लागत आहे. पुण्याला जाणारी भुसावळ-नाशिक-पुणे हुतात्मा या गाडीचे भाडे नव्वद आहे. मात्र, मार्चपासून ही महत्त्वाची गाडी बंद असल्याने रस्तामार्गे तिप्पट ते पाचपट भाडे खर्चून जावे लागते. वेळही जास्त लागतो. प्रदूषण, ट्रॅफिक जॅम, दगदग, जिवाला धोका या समस्याही आहेत.   

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

मध्य रेल्वेच्या ३४ फेस्टिव्हल विशेष गाड्यांना गर्दी 
मध्य रेल्वेने दहा दिवसांपासून ३४ फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू केल्या असून, नियमित ५६ गाड्या सोडल्या आहेत. फेस्टिव्हल गाड्यांचे भाडे जादा असून, पंचवटी, मंगलासारख्या नियमित गाड्यांचे भाडे पूर्वीप्रमाणेच आहे. नेहमीच्या प्रवासीगाड्या बंद असल्याने रेल्वेचा दिवसाला कोट्यवधींचा तोटा होत आहे. मालगाड्या व पार्सल ट्रेन तो भरून काढत आहेत.  प्रवाशांना रेल्वेस्थानकावर येऊन किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आरक्षण करता येते. नाशिक रोडला सिन्नर फाटा रेल्वे गेटवर शहरात तिबेटीयन मार्केट येथे आरक्षण केंद्र आहे. नाशिक रोडपेक्षा तिबेटीयन मार्केट केंद्रात रेल्वेला जास्त महसूल मिळतो. वर्षाला तो वीस कोटींच्या वर असतो. आरक्षण दोन तास, तसेच प्रसंगी अर्धा तास आधीही करता येते. फेस्टिव्हल व रेग्युलरसह सर्व गाड्यांना आरक्षण सक्तीचे असून, गाडी सुटण्याच्या आधी दीड तास रेल्वेस्थानकावर हजर राहावे लागते. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

सुरक्षेच्या उपाययोजना 

नाशिक रोडला रेल्वे सुरक्षा दलाने बंदोबस्त वाढविला आहे. महिला प्रवाशांना छेडछाड, अत्याचारापासून संरक्षणासाठी मेरी सहेली उपक्रम सुरू केला आहे. महिला प्रवाशांना मदतीसाठी प्रत्येक रेल्वेगाडी, तसेच स्थानकांत आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of festival special trains of Central Railway nashik marathi news