हे तर रहस्यच! गाडीच्या नुसत्या आवाजाने जमतात कावळे; एरव्ही घास भरविण्यासाठी प्रतीक्षा 

कमलाकर अकोलकर
Friday, 25 September 2020

पितृपंधरवड्यात पितरांना घास भरविण्यासाठी ठिकठिकाणी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागते. तासन् तास कावळ्यांनी घास घ्यावा म्हणून लोकांची यात्रेसारखी गर्दी होत असते. मात्र त्र्यंबकेश्‍वरला एक कार्यकर्ता असा आहे की, ज्यांची गाडी दिसली, तरी शेकडो कावळे जमा होतात.

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : पितृपंधरवड्यात पितरांना घास भरविण्यासाठी ठिकठिकाणी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागते. तासन् तास कावळ्यांनी घास घ्यावा म्हणून लोकांची यात्रेसारखी गर्दी होत असते. मात्र त्र्यंबकेश्‍वरला एक कार्यकर्ता असा आहे की, ज्यांची गाडी दिसली, तरी शेकडो कावळे जमा होतात.

असे कोणते रहस्य?
त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत दहा, बारा वर्षांपासून सकाळी व सायंकाळी कावळ्यांना अन्न घालतात. त्यांच्या वेळादेखील ठरलेल्या आहेत. आत्ताच्या‌ कालावधीत सावंत यांच्या दुचाकीच्या आवाजाने कावळे एकत्र येतात. कावळे त्यांच्या आगमनाची झाडांवर वाट बघत असतात हे विशेष! सावंतांना त्यांच्या एका मित्रामुळे ही सवय लागली असून, सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान, तर सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शे-दोनशे कावळ्यांसाठी लाह्या, शेवपापडी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ घेऊन ते निघतात.

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

कुणी तिष्ठत... तर सावंतांच्या गाडीने जमतात कावळे 

पाच मिनिटात गंगाद्वार पायथ्याशी अटल आखाड्याच्या जागेत येताच न दिसणारे कावळे मोठ्या संख्येने काव काव करीत त्यांच्याभोवती जमतात व टाकलेल्या खाद्यावर‌ तुटून पडतात. वेळप्रसंगी हातातूनही अन्न हिसकावून घेतात. न विसरता रोजचा हा क्रम त्यांचा अंगवळणी पडला असून, एखादे दिवशी अडचण आल्यास मदतनीसही जबाबदारी पार पाडतो, असेही सावंतांनी सांगितले. कित्येक वर्षांपासून सावंत यांचे व कावळ्यांचे प्रेम पाहायला मिळते. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crows gather on sound of a car nashik marathi news