बळीराजांची चिंता वाढली! द्राक्षपंढरीत घड जिरण्याचे प्रमाण वाढले; वातावरणातील बदलाचा फटका 

संदीप मोगल
Friday, 16 October 2020

काही वर्षापासून द्राक्षबागायदार शेतकऱ्यांना नवनवीन संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट यामुळे होणारे नुकसान प्रत्येक वर्षी वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

लखमापूर (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यात या वर्षी द्राक्षबागांना वातावरण बदलाचा मोठा फटका बसला असून, द्राक्षबागेत घड जिरण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक प्रकारची महागडी औषधे वापरूनही घड जिरण्याचे थांबत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

द्राक्षपंढरीत घड जिरण्याचे प्रमाण वाढले 
यंदा प्रत्येक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेत झाडावर एक सारखेपणा दिसत नाही. एका झाडावर दहा घड, तर दुसऱ्या झाडावर ४० घड अशा प्रकारे संपूर्ण बागेत विषमता दिसून येत आहे. गेल्या वर्षी ज्या द्राक्षबागांना पावसाचा फटका बसून घडकूज होऊन बागा उभ्या राहिल्या होत्या, त्या बागांमध्येही असाच प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या बागा उभ्या होत्या किंवा अतिशय कमी माल होता, अशा बागांच्या बाबतीत असा प्रकार कसा घडत आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

बळीराजांची चिंता वाढली
काही वर्षापासून द्राक्षबागायदार शेतकऱ्यांना नवनवीन संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट यामुळे होणारे नुकसान प्रत्येक वर्षी वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कोरोनामुळे शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होऊन त्याला भांडवलसुद्धा काढता आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष तोडून बांधावर टाकले. त्यामुळे मागील वर्षाचा संपूर्ण हंगाम वाया गेला. मात्र तरी पुढील हंगामाची तयारी द्राक्षबागायदारांनी केली. मात्र चालू वर्षी पुन्हा नवीन संकट त्यामध्ये परती पाऊस व घड जिरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे द्राक्ष शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

वातावरणातील बदलाचा फटका 
चालू वर्षी २ जूनला पावसाची सुरवात झाली. त्यामुळे सतत ढगाळ वातावरण व खरड छाटणीनंतर ४० ते ६० दिवसांत पाण्याचा हलकासा ताण पाहिजे तो देता न आल्याने सूक्ष्म घडनिर्मिती कमी झाली आहे. बागेत पांढऱ्या मुळीचा अभाव व सध्या बागेची छाटणी करताना मालाच्या काडीला पेस्ट करताना संपूर्ण डोळ्यांना पेस्ट चांगली होते किंवा नाही यांची द्राक्षबागायतदारांनी खात्री करून घ्यावी. - सुनील गवळी, द्राक्ष अभ्यासक, नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to the bunch of grapes dindori nashik marathi news