VIDEO : दारणा धरण भरले! मराठवाड्याला मिळणार दिलासा; वाचा सविस्तर

संपत देवगिरे
Friday, 14 August 2020

गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस सुरु आहे. या पावसात जोर नसले तरी सातत्य आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यात वाढ होऊ लागली आहे. दारणा समुहातील धरणांच्या पाणलोट क्षेत्र दिवसभर रिप रिप सुरु होती. त्यामुळे दारणा धरण भरले. या धरणातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरु झाला. हे पाणी गोदावरी नदीतून मराठवाड्याकडे जाणार आहे. त्यामुळे पाण्याची आस लावून बसलेल्या मराठवाड्यातील नेते, राजकारण शांत होण्यास मदत होणार आहे. 

नाशिक : गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस सुरु आहे. या पावसात जोर नसले तरी सातत्य आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यात वाढ होऊ लागली आहे. दारणा समुहातील धरणांच्या पाणलोट क्षेत्र दिवसभर रिप रिप सुरु होती. त्यामुळे दारणा धरण भरले. या धरणातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरु झाला. हे पाणी गोदावरी नदीतून मराठवाड्याकडे जाणार आहे. त्यामुळे पाण्याची आस लावून बसलेल्या मराठवाड्यातील नेते, राजकारण शांत होण्यास मदत होणार आहे. 

पिण्याचे पाणी व सिंचनासाठी चिंतेची स्थिती

यंदा पावसाने विलंब केला. जून-जुलै महिना अपवाद वगळता जवळपास कोरडा गेला. त्यामुळे धरणे रिकामी होती. सध्याचा महिन्यात मोठ्या पावसाची अपेक्षा होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. गतवर्षी २०१९ मध्ये या कालावधीत गंगापुर धरण समुहात ९३ टक्के साठा होता. यंदा फक्त ४३ टक्के आहे. दारणा समुहात १०० टक्के होता, तो यंदा ५२ टक्के, तर पालखेड समुहात ९६ टक्के साठा होता, तो यंदा अवघा ३१ टक्के आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी चिंतेची स्थिती आहे.

दहा हजार क्युसेक विसर्ग सुरु

भावली धरण भरले आहे. आज दारणा धरण ९० टक्के भरले. त्यामुळे त्यातून सुमारे दहा हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला. दारणा नदीला पुर आला. इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. गुरुवारी दिवसभरात १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकुण या परिसरात 2305 मि.मी. पाऊस झाला आहे. या महिन्याच्या वार्षीक सरासरीच्या 90.08 टक्के पाऊस आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निसर्ग वादळाच्या अतिवृष्टी नंतरच्या दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा पावसाची संततधार सुरु झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

सगळ्यांनाच दिलासा

नाशिकला पाऊस नसल्याने धरणांचा साठा कमी होता. आता त्यात लक्षणीय सुधारणा होत आहे. त्यामुळे दारणा, गोदावरी व पालखेड समुहातून गोदावरी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्याचा मराठवाड्यातील प्रकल्पांना विशेषतः जायकवाडीला लाभ होणार आहे. जायकवाडी धरणावर मराठवाडा भागातील उद्योग, शहरांचे पिण्याचे पाणी व सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे हा विषय राजकीय नेते, लोकप्रतिनिधी व प्रशासनासाठी संवेदनशील असतो. दोन दिवसांच्या पावसाने विसर्ग सुरु झाल्याने या सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे. 

 टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज संततधार सुरु आहे. पाणी पातळीत वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत दारणा धरणात  92.13 टक्के साठा आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास अतिरिक्त फुगवट्याच्या पाण्यामुळे  टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल. - सुरेश जाचक, शाखा अभियंता, दारणा धरण समूह.

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: darna dam full nashik marathi news