क्रीडा विश्वात हळहळ! माजी रणजीपटू शेखर गवळींचा तब्बल १६ तासांनी सापडला मृतदेह; वाचा सविस्तर

gavali 2.jpg
gavali 2.jpg

नाशिक / इगतपुरी : महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून खोल दरीत पडल्याची घटना मंगळवार ( ता. 1) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परिसरात घडली होती. शेखर गवळी हे माजी रणजीपटूदेखील आहेत. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकिंग सुरू असताना सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते 250 फुट खोल दरीत पडल्याचं प्रशासनाने सांगितले आहे.

शेखर गवळी ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी खोल दरी असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टिमला पाचारण करण्यात आले होते.मात्र आंधार पडल्याने त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते. 

पाण्याच्या डोहाच्या कडेला सापडला गवळी यांचा मृतदेह

नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इगतपुरीतील हॉटेल गणाकाच्या पाठीमागच्या परिसरातील डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेल्या ग्रुपमधील महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले होते. त्यांना शोधण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, अंधार आणि खोलदरी तसेच, 250 ते 300 फूट डोहामुळे शोधकार्यात अनेक अडचणी आल्या आणि अखेर शोध थांबवावा लागला. बुधवारी ( ता. 2 ) पहाटे 5 वाजेपासून तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर, कसारा व नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, मयुर गुप्ता, लक्ष्मण वाघ, दत्ता बाताडे, मानस लोहकरे, दयानंद कोळी, विकास लाटे, मिलींद लोहकरे, किरण धाईजे, यांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पुलाखालील एका पाण्याच्या डोहाच्या कडेला अडकलेल्या स्थितीत गवळी यांचा मृतदेह मिळुन आला. 

क्रीडा क्षेत्रात हळहळ

त्यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पोलीस हवालदार वैभव वाणी, शिवाजी लोहरे, नगरपरिषद अग्निशामक दलाचे यशवंत ताठे, नागेश जाधव आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे या घटनेमुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. शेखर गवळी हे 1997 ते 2004 पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रिकेट खेळलेले आहे. रणजी क्रिकेटचा अनुभव बघता त्यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असल्याचं त्यांनी सोशल मीडियाला यापूर्वी टाकलेल्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे. या दुखद घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गवळी यांनी अनेक खेळाडू घडवले.

शेखर गवळी यांनी अनेक खेळाडू घडवले. शेखर गवळी यांनी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात वेगळी छाप सोडली आहे. उत्तम प्रशिक्षक, गिर्यारोहक, फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांची ख्याती होती. जे इतरांना गिर्यारोहणचे धडे देत होते, त्यांनाच सेल्फीचा मोह आवरला नाही आणि दुर्दैवाने त्यांचा पाय घसरला आणि मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्यामुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com