दाभाडीत सरपंचपदाचा फैसला थेट जनता दरबारात; संपूर्ण गाव करणार गुप्त मतदान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

या वेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ‘वर्तुळ’ चिन्ह, तर ठरावाच्या विरुद्ध ‘त्रिकोण’ चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. गुप्त मतदानप्रक्रिया संपताच टी. आर. हायस्कूल येथे मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दाभाडी (नाशिक) : येथील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता बुधवारी (ता. २५) आमसभेद्वारे सार्वत्रिक गुप्त मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी गावातील १७ मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी करण्यात येत आहे. सरपंचपदाचा फैसला जनतेच्या दरबारात पोचल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.

तब्बल १७ मतदान केंद्रांवर निवडणूकप्रक्रिया

येथील थेट सरपंच चारुशीला निकम यांच्या विरुद्ध ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दाखल अविश्वास ठराव गुरुवारी (ता. ५) १४ विरुद्ध दोन मतांनी मंजूर झाला होता. नवीन नियमानुसार आमसभेत या ठरावावर शिक्कामोर्तब अनिवार्य आहे. तालुक्यातील सर्वांत जास्त मतदारसंख्या असलेल्या येथील ग्रामपंचायतीची आमसभा आणि किचकट निवडणूकप्रक्रिया प्रशासनासह राजकीय नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. तब्बल १७ मतदान केंद्रांवर निवडणूकप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबरला सहा वॉर्डांतील सतरा मतदान केंद्रांवर सकाळी सात ते दहा या वेळेत मतदार नावनोंदणी आणि ११ ते दोन या वेळेस नोंदणी झालेल्या मतदारांची मतदानप्रक्रिया घेण्यात येणार आहे.

अवघड जबाबदारी पेलावी लागणार

या वेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ‘वर्तुळ’ चिन्ह, तर ठरावाच्या विरुद्ध ‘त्रिकोण’ चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. गुप्त मतदानप्रक्रिया संपताच टी. आर. हायस्कूल येथे मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन्ही गटांकडून मतदारांना अत्यल्प वेळेत प्रबोधन करत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दोन वेळा बूथ केंद्रावर आणण्याची अवघड जबाबदारी पेलावी लागणार आहे. सध्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांनी सोशल मीडियासह विविध पत्रकांद्वारे राजकीय वातावरणनिर्मिती आरंभली आहे.

ग्रामपंचायत सदस्य ठरावाच्या बाजूने लढत

हिरे गटाकडून दशरथ निकम, हिरामण गायकवाड, नितीन निकम, हेमराज भामरे, नीलेश बाविस्कर, संदीप सुपारे, डॉ. उमेश निकम, नकुल निकम, डॉ. सुनील निकम, नंदू गवळी, नारायण मानकर, लालजी देवरे आदी अविश्वास ठरावाच्या विरुद्ध प्रयत्नशील आहेत, तर माजी जिल्हा परिषद सदस्य अमृत निकम, भिकन निकम, अशोक निकम, सुभाष नहिरे, दिलीप निकम, डॉ. एस. के. पाटील, नीलकंठ निकम, प्रमोद निकम, संजय निकम, जिल्हा परिषद सदस्या संगीता निकम, पंचायत समिती सदस्या कमळाबाई मोरे, ग्रामपंचायत सदस्य ठरावाच्या बाजूने लढत आहेत.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

सतरा हजारांहून अधिकची मतदारसंख्या आमसभेला कशी सामोरी जाते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सरपंचपदाचा फैसला आता जनता दरबारात पोचल्याने राजकीय अस्तित्वासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. तालुका नेतृत्वाने या संघर्षात उडी घेतल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision of Sarpanchpada is directly in Janata Darbar nashik marathi news