''विनायकदादा पाटील यांच्या जाण्याने जेष्ठ मार्गदर्शक हरपला'' - छगन भुजबळ

chhaganbhujbal4.jpg
chhaganbhujbal4.jpg

नाशिक : विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला. पाटील यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले... 

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केलं. पवार साहेबांचे ते जीवाचे मित्र होते. नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा 

निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

दादांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायकदादांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे छगन भुजबळ म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com