खडसेंच्या 'राष्ट्रवादी' प्रवेशाच्या चर्चेला उधाण! खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या भागात खडसे गट सक्रीय 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 28 September 2020

काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला उधाण आल्याने भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वतः खडसे यांनीदेखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले. तरीही खडसे यांच्याबरोबर १२ ते १५ आमदार जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या शहरातील भागात खडसे गट सक्रीय झाले आहेत, 

नाशिक : काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला उधाण आल्याने भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वतः खडसे यांनीदेखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले. तरीही खडसे यांच्याबरोबर १२ ते १५ आमदार जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या शहरातील सिडको भागातील खडसे गट सक्रीय झाला असून, कोणते व किती पदाधिकारी त्यांच्या गळाला लागतील, याचे तर्क लावले जात आहेत. 

सिडको परिसर हा खानदेश बहुल

नाशिकचा सिडको परिसर हा खानदेश बहुल आहे. या भागात बहुतांशी नागरिक हे धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे महापालिका, विधानसभा असो वा लोकसभा कोणत्याही निवडणुकीत येथे प्रचारसभा घेताना जळगावच्या नेत्यांना आवर्जून आणि आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. घरोघर देखील अहिराणी भाषेतील प्रचार होतो. या नेत्यांचे अस्सल अहिराणी भाषण ऐकण्यासाठी नागरिकही तेव्हढ्याच उत्साहाने जमतात. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा विचार करताना खानदेश पट्ट्यातील नेत्यांना अधिक प्राधान्य देतात. नुकतेच सहा महिन्यांपूर्वी सिडकोतील महापालिका पोटनिवडणुकीत सभा घेण्यासाठी खास जळगावच्या बड्या नेत्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या एका सभेने तो उमेदवार निवडून आल्याचे सांगण्यात येते. यावरून या भागात खानदेशी नेत्यांचा किती प्रभाव आहे, हे दिसून येते. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

वैयक्तिक स्तरावर गुप्तता 
गेल्या काही दिवसांपासून खानदेश पट्ट्यातील अन्‌ राज्यातील भाजपचे मोठे नेते अशी ओळख असलेले एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले. यासंदर्भात अनौपचारीक चर्चा व तयारीही झाल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर खडसेंच्या राजकीय निर्णयाचा परिणाम होईल. तसाच जळगावशी संलग्न असलेल्या नाशिकच्या राजकारणावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः नाशिक शहरातील सिडको विभागात सध्या भाजपचा वरचष्मा आहे. येथील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते खडसेंच्या गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. अशा राजकीय चर्चांना सध्या सिडको भागात उधाण आले आहे. मात्र, याबाबत व्यक्तीगत स्तरावर कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

कोंडी झालेल्यांना उभारी 
सिडको परिसरात भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रतिभा पवार, अलका अहिरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे या खानदेशच्या मातीशी संपर्क असलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील काही माजी मंत्री गिरीश महाजन यांना मानणारे आहेत. ते खडसे यांच्याही संपर्कात आहेत. हे नगरसेवक काय भूमिका घेतात, हे भविष्यातच ठरेल. मात्र यानिमित्ताने खडसे गट सक्रीय झाला आहे, हे नक्की. स्थानिक राजकारणात कोंडी झालेल्यांना ही राजकीय उभारीची संधी ठरण्याची शक्‍यता आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions on Khadse's NCP entry nashik marathi news