PhotoGallery : छंदातून साकारले पक्ष्यांचे जग...तब्बल 5 हजार छायाचित्रे 'त्यांच्या' संग्रहात...एकदा बघाच

सोमनाथ कोकरे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जुलै 2020

निसर्गाच्या सान्निध्यात बालपण गेल्याने तेव्हापासूनच निसर्गाबाबत वेगळं आकर्षण होतं. सृष्टीतील विविधता, वृक्ष, प्राणी, पक्षी, वनस्पती यांची लहानपणापासूनच आवड अन्‌ ओढ. पुढे शिक्षणामुळे घराबाहेर पडल्यावर थोडा अडसर निर्माण झाला. मात्र, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर तर निसर्गाची ओढ अधिकच तीव्र झाली.

नाशिक : अनेकजण आयुष्यभर काहीतरी छंद जोपासतात. त्यातून मिळणारा आनंदही आगळावेगळा असतो. असाच छंद जोपासत म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील साईकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत बोरसे यांनी पक्ष्यांच्या छायाचित्रांमधून त्यांचे अनोखे जग साकारलेय...तब्बल 64 प्रकारच्या पक्ष्यांची जवळपास चार ते पाच हजार छायाचित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. 

निसर्गाच्या सान्निध्यात बालपण

छायाचित्रणाची आवड आणि त्यातून जोपासलेला छंद याविषयी डॉ. बोरसे म्हणाले, की जव्हार (ता. पालघर) हा निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला परिसर. अशा निसर्गाच्या सान्निध्यात बालपण गेल्याने तेव्हापासूनच निसर्गाबाबत वेगळं आकर्षण होतं. सृष्टीतील विविधता, वृक्ष, प्राणी, पक्षी, वनस्पती यांची लहानपणापासूनच आवड अन्‌ ओढ. पुढे शिक्षणामुळे घराबाहेर पडल्यावर थोडा अडसर निर्माण झाला. मात्र, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर तर निसर्गाची ओढ अधिकच तीव्र झाली. त्यातूनच काही वर्षांपूर्वी छायाचित्रणाचा छंद जडला. खरेतर छायाचित्रणाचा छंद हा महागडा. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी तर त्याहून महागडी. त्यासाठी कॅमेरा, विविध प्रकारच्या लेन्सेस, ट्रायपॉड आदी गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे जमेल तशी एक-एक वस्तू खरेदी करीत हा छंद जोपासत असल्याचे डॉ. बोरसे सांगतात. 

क्षण टिपण्याचा आनंद काही औरच

रुग्णसेवा हे प्रथम कर्तव्य; पण त्यातून स्वतःसाठी काढलेला वेळ पक्षी, निसर्गातील विविध रुपे, भेटणारी आगळीवेगळी माणसे व त्यांचे चेहरे टिपण्यात जातो. नाशिक शहर व परिसरातील विविध जातीच्या पक्ष्यांची पाच ते सहा हजार छायाचित्रे काढली आहेत. त्यात 64 प्रकारचे पक्षी आहेत. हे पक्षी पंचवटी, म्हसरूळ, मखमलाबाद, आडगाव, बोरगड व गंगापूर धरण आदी परिसरात आढळले. याशिवाय आडगावला पोलिस मुख्यालयामागील छोट्या जलाशयावरही विविध पक्षी येतात. ते टिपण्याचा आनंद काही औरच असल्याचेही त्यांनी नमुद केले. 

संग्रहातील पक्षीचित्रे 

डॉ. बोरसे यांच्या संग्रहात शराटी, शिकरा, मोर, लांडोर, मैना, चिमणी या सामान्य पक्ष्यांबरोबरच राखी कोहकाल, वेडा राघू, गाय बगळा, चिरक, चक्रवाक, कोकिळा, वारकरी, राखी वाटवट्या, मुग्ध बलाक, पानकावळा, चित्रबलाक, पळस मैना- मधुसरिका, कोतवाल, बुलबुल, धिवर, भारद्वाज, दलदली तुतारी, अडई या पक्ष्यांचेही नाशिक व परिसरात काढलेली छायाचित्रे आहेत. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

पक्ष्यांमधील विविधता टिपण्याचा छंद गेल्या चार ते पाच वर्षांपासून जोपासत आहे. त्यामुळे सदैव आनंद व उत्साह मिळतो. पक्षी व त्यांच्यातील विविधता, पक्ष्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद वेगळाच असतो. - डॉ. हेमंत बोरसे  

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Borse has created a world of birds through his hobbies nashik marathi news