तीनशे कोंबड्यांच्या अचानक मृत्यूने परिसरात एकच खळबळ; अहवालानंतर झाला खुलासा

साहेबराव काकुळते
Thursday, 28 January 2021

बर्ड फ्लूबद्दल आदिवासींमध्ये माहिती नाही. वग्रीपाडा येथे पाहणी केली असता सर्वच आदिवासी शेतकऱ्यांच्या कोंबड्या मोकळ्या फिरताना दिसल्या. याबाबत सरपंच लक्ष्मण माहले यांनी गुरुवार (ता.२८)पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पाळीव कोंबड्या जेसीबीने खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात पुरण्याचे सांगण्यात आले.

डांगसौंदाणे (नाशिक) : बागलाणच्या पश्‍चिम भागात दोन-तीन दिवसांत मृत कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

वाठोडा गटग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील शेतकरी सुरेश महाले यांनी आर. आर. प्रजातीच्या सुमारे तीनशे कोंबड्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी घरीच छोट्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. कोंबड्यांच्या अचानक मृत्यूने महाले यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या कोंबड्यांचा अहवाल प्रयोगशाळेत पाठवला होता. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत मृत कोंबड्या जेसीबीने खड्डा खोदून पुरून दिल्याने गावात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी (ता. २७) दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सरपंच लक्ष्मण महाले यांनी ग्रामस्थांना कोंबड्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. सुरेश महाले यांच्या शेडमध्ये भेट दिली असता उर्वरित दहा कोंबड्यांचाही पुन्हा मृत्यू झाल्याचे दिसले. 

बर्ड फ्लूबद्दल आदिवासींमध्ये माहिती नाही

बर्ड फ्लूबद्दल आदिवासींमध्ये माहिती नाही. वग्रीपाडा येथे पाहणी केली असता सर्वच आदिवासी शेतकऱ्यांच्या कोंबड्या मोकळ्या फिरताना दिसल्या. याबाबत सरपंच लक्ष्मण माहले यांनी गुरुवार (ता.२८)पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पाळीव कोंबड्या जेसीबीने खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात पुरण्याचे सांगण्यात आले. ज्यांच्या कोंबड्या ग्रामपंचायत प्रशासनाला आढळतील, अशा सर्व कोंबड्या ग्रामपंचायत प्रशासन स्वतः जेसीबीने केलेल्या खड्ड्यात पुरणार असल्याची माहिती सरपंच महाले यांनी दिली. गावात निर्जंतुकीसाठी फवारणी करणार असल्याची माहिती ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली. डांगसौंदाणे आठवडे बाजार बुधवारी असून, हा बाजार कोंबड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील बर्ड फ्लूची सकाळपर्यंत कोणालाही वार्ता नसल्याने या भागातील बहुतांश आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या कोंबड्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

२२ जानेवारीला गावातील शेतकऱ्याने पक्षी मृत झाल्याची माहिती फोनवरून दिल्याने या पक्ष्यांचे तपासणी अहवाल पुणे आणि भोपाळ येथे पाठविले होते. काल उशिरा अहवाल सकारत्मक आल्याने परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील सर्व पक्षी पकडून एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून पुरण्यात येतील. - डॉ चंदन रुद्रवंशी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, बागलाण  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to bird flu in Dangsaundane Three hundred hens died nashik marathi news