विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई...आठ गुंडांना केले हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या हद्दीतील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात सराईत गुन्हेगार तसेच गुंडांच्या टोळ्यांकडून गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण होते.

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीच्या परिमंडळ दोनमध्ये कार्यरत असलेल्या तीन गुन्हेगारी टोळ्यांतील आठ गुंडांना शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांच्या आदेशान्वये सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. या टोळ्या नाशिकरोड, उपनगर आणि अंबड परिसरात संघटितरित्या गुन्हे करीत दहशत माजवित होत्या. 

होते भितीचे वातावरण
शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या हद्दीतील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात सराईत गुन्हेगार नवाज उर्फ बाब बब्बू शेख, उपनगरच्या हद्दीत मयुर चमन बेद आणि अंबडच्या हद्दीमध्ये मोबीन तन्वीर कादरी या गुंडांच्या टोळ्यांकडून गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण होते.

आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांच्या आदेशानुसार संबंधित तीनही पोलिस ठाण्यांमार्फत या टोळ्यातील संशयित गुंडांचे तडीपारीचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार, नाशिकरोडच्या शेख टोळीतील सराईत गुन्हेगारी अक्षय बाळू धुमाळ (23, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड), मोसिन युसूफ पठाण (26, रा. सादीकनगर, वडाळागाव), शुभम ज्ञानेश्वर सूर्यवंशी (20, रा. देवळालीगाव राजवाडा), त्याचप्रमाणे, उपनगरच्या बेद टोळीचा म्होरक्‍या मयुर वमन बेद (31), संजय उर्फ मॉडेल चमन बेद (33), रोहित उर्फ माथ्या उर्फ बंटी गोविंद महाले उर्फ हिंगम (23, सर्व रा. फर्नाडिस वाडी, जयभवानी रोड, उपनगर), तसेच, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबीन तन्वीर कादरी, त्याचा साथीदार गौरव उमेश पाटील (दोघे रा. उपेंद्रनगर, साईबाबानगर, सिडको) या आठ गुंडांना शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई परिमंडळ दोनतर्फे करण्यात आली आहे. 

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

नाशिकरोड, उपनगर, अंबडमध्ये शहर परिमंडळ दोनची कारवाई 

शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तडीपार करण्यात आलेले शहर-जिल्ह्यात आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यासंदर्भात गुप्तता पाळली जाईल आणि गुंडांवर कठोर कारवाई केली जाईल. - विजय खरात, उपायुक्त, परिमंडळ दोन, नाशिक. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight gangsters were deported from the city-district nashik marathi news