esakal | जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक नव्या वर्षातच! नव्याने जाहीर होणार कार्यक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections.jpg

राज्यभरातील एक हजार ५६६ व जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे छाननीच्या टप्प्यावर स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता नवमतदारांना संधी देऊन नवी मतदार यादी करून लवकरच नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक नव्या वर्षातच! नव्याने जाहीर होणार कार्यक्रम 

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (नाशिक) : राज्यभरातील एक हजार ५६६ व जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे छाननीच्या टप्प्यावर स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता नवमतदारांना संधी देऊन नवी मतदार यादी करून लवकरच नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्षभरात मुदत संपलेल्या ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या वर्षातच होणार हे स्पष्ट झाले आहे

१०२ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित
चालू वर्ष निवडणुकीचे वर्ष होते. मात्र, कोरोनाने सगळे चित्र बदलले आहे. एप्रिल ते जूनमध्ये मुदत संपलेल्या राज्यातील एक हजार ५६६, तर जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २४ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील कळवणमधील २९, येवल्यातील २५, दिंडोरीतील ४४, इगतपुरीतील चार अशा १०२ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ठिकाणी ३१ मार्चला मतदान आणि १ एप्रिलला मतमोजणी होणार होती. मात्र ६ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज छाननीच्या टप्प्यावर असताना कोरोनाची धकधक वाढत गेल्याने १७ मार्चला निवडणूक आयोगाने आदेश काढीत निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यानंतर गावोगावी निवडणुका होण्याचा आशावाद होता, पण आजच्या आदेशानुसार जुना कार्यक्रम रद्द झाल्याने येथे नव्याने सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

आता नव्याने जाहीर होणार कार्यक्रम 

तत्पूर्वी ३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदारयादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदारयाद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदारयादी १ जानेवारी २०१९ या अर्हता तारखेवर आधारित होती. मात्र मध्ये मोठा कालावधी गेला असून, भारत निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२० या अर्हता तारखेवर आधारित अद्ययावत मतदारयादी २५ सप्टेंबर २०२० ला प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदारयादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारीच्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदारयादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदारयादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

या आदेशात जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा उल्लेख नाही. मात्र, यासाठी मतदारयादीचा कार्यक्रम नुकताच पूर्ण झाला आहे. त्यामुळे या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षीच होऊ शकतील, असा अंदाज आहे. 


जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 
बागलाण : ४० 
चांदवड : ५३ 
देवळा : ११ 
येवला : ४४ 
नाशिक : २५ 
नांदगाव : ५९ 
मालेगाव : ९९ 
इगतपुरी : ४ 
दिंडोरी : १६ 
त्र्यंबकेश्‍वर : ३ 
सिन्नर : १०० 
निफाड : ६५ 
एकूण : ५१९ 
 
 

go to top