आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचा ताप! कोरोनाच्या साडेसातीत कामाचा ताण 

संतोष विंचू
Monday, 28 September 2020

कोरोना महामारीत नागरिकांचे आरोग्य ज्या विभागाच्या हातात आहे, तोच आरोग्य विभाग सध्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा ताप सहन करतोय. आरोग्य विभागावर सध्या कामांचे ओझे वाढलेले असताना सुमारे चाळीस टक्क्यांवर रिक्त पदांचे ओझे घेऊन आहे ते कर्मचारी रुग्णसेवा करत आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने शासनाने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. 

नाशिक / येवला : कोरोना महामारीत नागरिकांचे आरोग्य ज्या विभागाच्या हातात आहे, तोच आरोग्य विभाग सध्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा ताप सहन करतोय. आरोग्य विभागावर सध्या कामांचे ओझे वाढलेले असताना सुमारे चाळीस टक्क्यांवर रिक्त पदांचे ओझे घेऊन आहे ते कर्मचारी रुग्णसेवा करत आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने शासनाने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. 

आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचा ताप!

कोरोना आला व मार्चपासून कधी नव्हे, इतके कामाचे ओझे आरोग्य विभागावर येऊन पडले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता आहे त्या कर्मचाऱ्यांनाही काम करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने अपुरे पडणारे मनुष्यबळ आरोग्य विभागापुढील महत्त्वाची समस्या बनली असल्याचे दिसते. सध्या उपचारासह विविध सर्वेक्षण व उपाययोजनांमध्येही आरोग्य विभागाचा महत्त्वाचा सहभाग असल्याने ही पदे प्राधान्याने भरण्याची वेळ आली आहे. 

कोरोनाच्या साडेसातीत कामाचा ताण 
जिल्ह्यात १०४ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी १५ पदे मंजूर असतात, तर ५७७ उपकेंद्रे असून, प्रत्येक उपकेंद्राला दोन कर्मचारी मंजूर आहेत. याशिवाय पंधरा पथके व अकरा आयुर्वेदिक दवाखानेही सुरू आहेत. यातील वैद्यकीय अधिकाऱ्याची वर्ग दोनची रिक्त असलेली ११० पदे व विविध संवर्गातील रिक्त ८२३ पदे भरण्याबाबत जुलैमध्ये जिल्हा परिषदेने सार्वजनिक आरोग्य व ग्रामविकास विभागाला पत्र देऊन विनंतीही केली आहे. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष वेधत असल्याने आता तरी शासनाने याला प्राधान्यक्रम द्यावा, अशी अपेक्षा आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

नव्या केंद्रांना द्या कर्मचारी 
जिल्ह्यात दोन ते तीन वर्षांत नव्याने काही संस्थांची पदे वाढली असून, अनेक ठिकाणी नव्याने आरोग्य केंद्र व उपकेंद्रदेखील कार्यान्वित झाले आहे. याठिकाणी अपेक्षित कर्मचारी मिळालेले नाहीत. विविध पातळ्यांवर मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात आरोग्य कर्मचारी नसल्याने ही आरोग्य केंद्र व उपकेंद्र नावालाच दिसताय. त्यामुळे अशा ठिकाणीही तत्काळ पदभरती करावी, अशी मागणी होत आहे. 

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाची पदे रिक्त असल्याने आम्ही वारंवार पाठपुरावा करून ही पदे भरतीची मागणी केली आहे. आरोग्यमंत्र्यांना याबाबत भेटून पत्रही दिले असून, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सुमारे १५ टक्के रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - सुरेखा दराडे, सभापती, आरोग्य व शिक्षण समिती, जिल्हा परिषद, नाशिक 

राजापूर येथील नव्या आरोग्य केंद्राला तत्काळ मंजूर पदांनुसार कर्मचारी मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी पदभरतीची नितांत गरज आहे. - प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला 

अशी आहेत रिक्त पदे - 
पद - मंजूर - भरलेली - रिक्त पदे 
वैद्यकीय अधिकारी – २०९ – १९९ - ११० 
औषध निर्माण अधिकारी - १९९ - ९५ - २४ 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ६९ - ५१ - १८ 
आरोग्य पर्यवेक्षक - ५ - १ - ४ 
आरोग्यसेवक - ५६८ - ३२० - २४८ 
आरोग्यसेविका - १०६९ - ५४० - ५२९ 
एकूण - २०३९ - १२०६ - ९३३  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: empty recruitment health department nashik marathi news