"ट्रम्प साहेब! तुमच्या "ड्यूटी फ्री' चिकन लेग दबावाला प्रतिसाद दिला.. तर मग भारतातील पोल्ट्री उद्योगाचे काय ??

poultry.jpg
poultry.jpg

नाशिक : सरकारी अनुदानाच्या जोरावर जगात अमेरिकन लेग पीस स्वस्तात विकतात. भारताने त्यावर 100 टक्के आयातशुल्क लावले असल्याने देशात किलोचा भाव 240 रुपयांपर्यंत जातो. भारतीय चिकन चांगले भाव असताना 180 रुपये किलो मिळते. त्यामुळे अमेरिकन लेग पीस स्पर्धा करू शकत नाही. मात्र "ड्यूटी फ्री' चिकन लेगच्या अमेरिकेच्या दबावाला प्रतिसाद दिल्यास चिकनकडील ग्राहक कमी होतील आणि देशातील वार्षिक 60 हजार कोटींच्या पोल्ट्री उद्योगाच्या अस्तित्वाचे संकट तयार होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

कोलेस्ट्रॉल आयातीचा धोका भारत कितपत स्वीकारणार?

दरम्यान, देशात पोल्ट्री उद्योगाच्या खाद्यासाठी एकूण उत्पादनापैकी 60 ते 70 टक्के मका, सोयाबीन वापरला जातो. मका आणि सोयाबीनचा उत्पादन खर्च अधिक असल्याने जगात विकण्याचा प्रश्‍न तयार होऊन देशांतर्गत भाव कोसळून त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागेल. मुळातच, अमेरिकन फ्रोझन चिकनवर ताव मारतात; पण लेग पीस खात नाहीत, तसेच अमेरिकन कोंबड्यांचे वजन चार किलो असते. त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. म्हणून कोलेस्ट्रॉल आयातीचा धोका भारत कितपत स्वीकारणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

"कोरोना'च्या अफवांमुळे महाराष्ट्रातील उत्पादकांना 600 कोटींचा दणका​

चिकनशी "कोरोना'चा संबंध जोडलेल्या अफवांमुळे 15 दिवसांत महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योग आणि निगडित शेतमालाच्या भाव घसरणीतून 600 कोटींचा दणका बसला. कोंबड्यांच्या खाद्यातील 15 टक्के घटकांची आयात चीनमधून बंद झाली. या घटकांच्या किमतीत दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने उत्पादकांना 50 कोटींची झळ बसली. आता चिकनशी "कोरोना'चा संबंध नसल्याचा विश्‍वास ग्राहकांमध्ये तयार झाल्याने चिकनचा खप 80 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला. रविवारी (ता. 23) किलोचा भाव 40 रुपये झाला. सोमवार (ता. 24)पासून भाव किलोला पाच ते सहा रुपयांनी वाढण्याचा विश्‍वास उत्पादकांना वाटतो आहे. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्लीसह दक्षिण भारतामध्ये अगोदरच ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन कमी असल्याने या राज्यांत कोंबड्या विक्रीस पाठविल्या

राज्यात चार कोटी कोंबड्यांचे उत्पादन 
राज्यात महिन्याला चार कोटी कोंबड्यांचे उत्पादन होते. कोंबड्यांच्या उत्पादनासाठी किलोला 70 रुपये खर्च येतो. अफवा पसरण्यापूर्वी कोंबड्यांना किलोला 70 रुपये भाव मिळायचा. अफवा पसरल्यानंतर खप 75 टक्‍क्‍यांनी गडगडला. कोंबड्यांचा भाव किलोला 35 रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे प्रत्यक्ष ब्रॉयलर कोंबडी उद्योगाला दीडशे कोटींच्या झळा बसल्या. त्याच वेळी मका आणि सोयाबीनच्या भावात क्विंटलला 300 रुपयांची घसरण झाली. त्याचा शेतकऱ्यांना 400 कोटींचा फटका बसला. 

पोल्ट्रीसाठी 250 कोटींची गरज 
"कोरोना'शी संबंधित अफवांनी भाव कोसळल्याने पोल्ट्री उद्योगातील खेळते भांडवल 150 कोटींनी कमी झाले आहे. पुढील दहा दिवसांच्या उत्पादनासाठी आणखी 100 कोटींची आवश्‍यकता भासणार असल्याने बॅंकांनी कर्जाची पुनर्रचना करून 250 कोटी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांची आहे. 

कोरोना मानवापासून मानवाला संक्रमित होतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाद्यातून बाधा नाही, हे शास्त्रज्ञांच्या संशोधनातून आणखी अधोरेखित झाले आहे. -डॉ. प्रसन्न पेडगावकर, सरव्यवस्थापक, व्यंकटेश्‍वरा हॅचरीज 

देशभरातील तीन कोटी लोक पोल्ट्री आणि तेवढेच शेतकरी मका आणि सोयाबीन उत्पादनाशी निगडित आहेत. चिकनमध्ये अमेरिका प्रथम आणि भारत पाचव्या क्रमांकावर आहे, तसेच देशात जीएम मका लागवडीला परवानगी दिली जात नाही. मात्र, अमेरिकन चिकन लेगच्या मुक्त व्यापाराला मान्यता द्यायची म्हटल्यावर जीएम मक्‍यावर वाढलेल्या कोंबड्यांच्या रोगाला देशात शिरकाव करू द्यायचा काय? हा दुटप्पीपणा देश हिताचा आहे काय, याचा विचार व्हायला हवा. -उद्धव आहेर, आनंद ऍग्रो ग्रुप  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com