जिल्ह्यात कांदा पेरणीचा प्रयोग! रोपे सडल्याने तेजीच्या संधीसाठी बळीराजाचा जुगार

संतोष विंचू
Sunday, 18 October 2020

वातावरणामुळे रोपे सडली, लागवड झालेले कांदेही अर्ध्यावर मृत झाले, त्यात आता भावही तेजीत आहे; पण आपत्तीत करायचे काय? या प्रश्नावर शेतकऱ्यांनी उत्तर शोधत पारंपरिक कांदा लागवडीला बाय बाय करत कांदे पेरणीचा पर्याय निवडला असून, जिल्ह्यात सुमारे हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कांदा पेरणी होत आहे.

नाशिक : (येवला) कितीही संकट येऊ द्या, हरेल तो शेतकरी कुठला..! जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तर संकटांची सवयच झाली असल्याने अडथळ्यांवर ते सहजासहजी मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. वातावरणामुळे रोपे सडली, लागवड झालेले कांदेही अर्ध्यावर मृत झाले, त्यात आता भावही तेजीत आहे; पण आपत्तीत करायचे काय? या प्रश्नावर शेतकऱ्यांनी उत्तर शोधत पारंपरिक कांदा लागवडीला बाय बाय करत कांदे पेरणीचा पर्याय निवडला असून, जिल्ह्यात सुमारे हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कांदा पेरणी होत आहे. 

तेजीची संधी साधण्यासाठी बळीराजाचा जुगार

सततच्या पावसामुळे पोळची रोपे, कांदे तसेच रांगडा व उन्हाळ कांद्यांच्या रोपाची वाताहत झाली. अतिवृष्टीमुळे कोलमडलेल्या शेतीव्यवस्थापनावर मात करत रांगडा, लाल व उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांचे भाव दोन हजार ५०० ते चार हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊनही शेतकरी हार मानायला तयार नाही. खरेदी केलेल्या कांदा बियाण्यांची खात्री, उगवण क्षमता, भेसळ यावरही पेरणी व लागवड पद्धतीतील कांद्याचे भवितव्य अवलंबून आहे. विनाबिल, विनाखात्रीचे कांदे बियाणे कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून भविष्यात कांद्याला मोठा भाव मिळेल, या आशेपोटी शेतकरी पेरणीतून कांदा उत्पादनाचा मोठा जुगार खेळत आहेत. आज कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे कुठलेही रांगडा, लाल व उन्हाळचे रोप शिल्लक नाही. तर पोळचे रोप व लागवड केलेला कांदा पूर्णपणे सडल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दहा टक्केच क्षेत्र राहिल. रांगडा, लाल व उन्हाळची रोपे नसल्याने, बियाण्यांचा तुटवटा निर्माण झाल्याने मोठी समस्या उभी राहिली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा यांत्रिक सहाय्याने पेरणी करण्याकडे कल वाढला आहे. 

रोज दहा ते बारा एकर कांदे पेरणी

आज उन्हाळ कांद्याचे रोप टाकले, तर सहा महिने म्हणजे एप्रिलअखेर पाणी लागणार आहे. आज जरी विहिरींची पातळी समाधानकारक असली तरी मार्च-एप्रिलमध्ये शेवटचे दोन-तीन पाणी कांद्यांना देता येतील का? याची शाश्वती नाही. याउलट आज पेरणी झालेले कांदे साडेचार महिन्यांनी निघणार म्हणजे फेब्रुवारीअखेर निघणार असून, अंतिम दोन-तीन पाण्याची समस्या उद्भवणार नाही. लागवडीच्या तुलनेत पेरणी केलेल्या कांद्याच्या उत्पादनासाठी मनुष्यबळ, कष्ट, उत्पादन खर्च, बियांचे प्रमाण कमी असून, पेरलेल्या कांद्यांची अवस्था बरी आहे. या समाधानकारक परिस्थितीचा आधार घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिक सहाय्याने कांदा पेरणीसाठी सुरुवात केली आहे. सध्या ट्रॅक्टरचालित कांदा पेरणी यंत्राला मोठी मागणी असून, रोज दहा ते बारा एकर कांदे पेरणी केली जाते. विशेष म्हणजे पुढील आठ दिवसांची कांदा पेरणी बुकिंग झाल्याचे सायगाव येथील ट्रॅक्टर कांदा पेरणीयंत्रधारक महेश भालेराव यांनी सांगितले. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

अडचणी असल्या तरी हंगाम हातचा जाऊ नये म्हणून पेरणीचा जुगार शेतकरी खेळत आहे. मी दोन एकर पोळ कांदे पेरले असून स्थिती समाधानकारक आहे. आता दोन एकर रांगडा, लाल कांदा पेरणी केली असून, उन्हाळही तीन एकर पेरणार आहे. सात एकर पेरणी केलेले व दोन एकर लागवडीचे असे कांदा क्षेत्र राहणार आहे. परिस्थितीनुरुप बदल केला आहे. - भागूनाथ उशीर, प्रयोगशील शेतकरी, सायगाव 

*कांद्याचे गणित... 

एक एकर पेरलेल्या कांद्याचा खर्च 
-रोटावेटर- १८०० 
-कांदा बियाणे दोन किलो- ६५०० 
- पेरणी मजुरी- २२०० 
- दांड पाडणे- ३०० 
-एकूण खर्च- १०८०० 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

एक एकरपर्यंत लागवड केलेल्या कांद्याचा खर्च 

-कांदा बियाणे पाच किलो- १६ हजार २५० 
-रोप तयार करणे- तीन हजार 
-रोटावेटर- १८०० 
-सारे व दांड पांडणे- १००० 
-वाफे बांधणे- २२०० 
-रोप उपटणे खर्च- २००० 
-कांदा लागवड- ८००० 
-एकूण खर्च- ३४,२५० 

(हे दोन्ही खर्च लागवडीपर्यंतचेच आहेत. यापुढे तणनाशक, निंदणी, औषधे, खते, पाणी देणे, काढणी हा पुढील सर्व खर्च दोन्ही प्रक्रियेत समान आहे.) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment of onion sowing in the district nashik marathi news