पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यापाऱ्‍याला लुटले; परिसरात खळबळ   

रोशन खैरनार
Monday, 28 September 2020

सोसायटी प्रवेशद्वारात प्रवेश करताच पाठीमागून दुचाकीवर एक व्यक्ती आली आणि तिने ‘इथे अशोकराव नावाची कुणी व्यक्ती राहते का? काल रात्री दोनला आम्ही गांजा पकडला असून, त्याच्या चौकशीकामी भेटायचे आहे. आम्हाला तुमचीही चौकशी करायची आहे,’ अशी बतावणी करीत खिशातील पोलिसाचे बनावट ओळखपत्र दाखविले..

नाशिक/सटाणा : पोलिस असल्याचा बनाव करत तोतयाने शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपयांचा सोने व चांदीचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सोमवारी (ता. २८) भरदिवसा सव्वाअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

 बनावट ओळखपत्रही दाखवले

शहरातील मालेगाव रस्त्यावरील समर्थ हाउसिंग सोसायटीत प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यापारी ओंकारमल जसकरण भांगडिया (वय ७९) वास्तव्यास आहेत. कोरोना काळात लॉकडाउन झाल्यापासून सहा महिन्यांनंतर सोमवारी सकाळी पहिल्यांदाच कामानिमित्त ते आपल्या स्कूटीवरून घराबाहेर पडले होते. यानंतर ते टिळक रोडने घराकडे स्कूटीवरून परतले. सोसायटी प्रवेशद्वारात प्रवेश करताच पाठीमागून दुचाकीवर एक व्यक्ती आली आणि तिने ‘इथे अशोकराव नावाची कुणी व्यक्ती राहते का? काल रात्री दोनला आम्ही गांजा पकडला असून, त्याच्या चौकशीकामी भेटायचे आहे. आम्हाला तुमचीही चौकशी करायची आहे,’ अशी बतावणी करीत खिशातील पोलिसाचे बनावट ओळखपत्र दाखविले.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

गुटखाप्रकरणात चौकशी करत असल्याचा बनाव

‘आम्ही पोलिस असून, सटाणा शहरात सापडलेल्या दोन लाख रुपयांच्या गुटखाप्रकरणी तुमची चौकशी करायची आहे, तुम्ही आपल्या सोन्याच्या सर्व वस्तू रुमालामध्ये गुंडाळून ठेवा,’ सांगीतले. दरम्यान याच वेळी मालेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या‍ एका व्यक्तीस त्या तोतया पोलिसाने त्याच्याकडील सोन्याच्या वस्तू काढून रुमालात ठेवायला सांगीतले, त्याने तसे करण्याचे नाटक केले. त्यानंतर भांगडिया यांनी घाबरत आपल्याकडील ६५ ग्रॅमच्या सोन्याच्या चार अंगठ्या आणि मोत्याचा खडा असलेली चांदीची एक अंगठी तसेच मोबाईल आणि इतर वस्तू काढून रुमालात ठेवल्या.

ते दोघे निघून गेले

तोतयाने सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून घेत रुमालाचे गाठोडे भांगडिया यांच्याकडे दिले. त्यानंतर तोतयाने रस्त्यावरून जाणाऱ्या त्या व्यक्तीला, ‘तुला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सोडतो,’ असे सांगून दुचाकीवरून ते निघून गेले. दरम्यान,  भांगडिया यांनी घरी पोचताच मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी रुमाल उघडून बघितला असता त्यात फक्त मोबाईल आढळला. त्यांनी हा प्रकार मुलगा किशोर भांगडिया यांना सांगितला असता दोघांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake police robbed the trader nashik marathi news