दलाल, व्यापारी तुपाशी अन् शेतकरी मात्र उपाशी...'मिरची'चा ठसका शेतकऱ्यांला सोसेना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लाल व काळा मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव कोरोनामुळे दुप्पट झाले आहेत, तर दुसरकीडे हिरवी मिरची मात्र शेतकऱ्याला पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत आहे. 

नाशिक/देवळा : लाल व काळा मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव कोरोनामुळे दुप्पट झाले आहेत, तर दुसरकीडे हिरवी मिरची मात्र शेतकऱ्याला पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत आहे. यामुळे दलाल व व्यापारी तुपाशी असताना शेतकरी मात्र उपाशीच, अशी स्थिती मिरची उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. 

जाड मिरचीला अत्यल्प भाव

सध्या हिरवी मिरची काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी मालेगाव, धुळे येथे मिरची विकायला जाता येत नसल्याने नाइलाजास्तव कमी भावात व्यापाऱ्यांना ती विकण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे शेतकरी बाहेरगावी शेतमाल विकण्यास घाबरत असल्याने त्याचा फायदा दलाल व व्यापारी घेत आहेत. दर वर्षी या दिवसात मिरचीला 50 ते 100 रुपये किलो असा भाव हमखास मिळतो. परंतु यंदा कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने हिरवी मिरची प्रकारानुसार 15 ते 40 रुपये किलो या दराने विकावी लागत आहे, तर जाड मिरचीला अत्यल्प भाव असल्याने काही शेतकऱ्यांनी तोडणी अर्ध्यावर बंद केली आहे.

शेतकरी मात्र उपाशीच

झाडावरच मिरच्या पिकून लाल होऊ लागल्याने काही शेतकऱ्यांनी लाल मिरची तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यासाठी मेहनत व मजुरी वाढत आहे. शेतकऱ्यांकडील मिरचीची अशी अवस्था असताना मसाला व लोणचे तयार करण्यासाठी दुकानांमध्ये वाळलेली लाल मिरची 200 ते 300 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. यामुळे दलाल व व्यापारी तुपाशी असताना शेतकरी मात्र उपाशीच, अशी स्थिती मिरची उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

भरउन्हात कष्ट करत मिरची पिकवली; परंतु आता मिरची विकावी कशी व कुठे, असा प्रश्‍न आहे. व्यापारी बांधावर खरेदी करताना कमी भावाने खरेदी करतात आणि याउलट दुकानात लाल मिरची घेताना चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहे. - भास्कर रौंदळ, मिरची उत्पादक शेतकरी

हेही वाचा > स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are losing money from the sale of chillies nashik marathi news