तब्बल १३४७ शेतकऱ्यांनी संपविली आपली जीवनयात्रा; उत्तर महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर

प्रशांत बैरागी
Friday, 1 January 2021

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने ‘अन्नदाता सुखी भव’ असे आदराने बोलले जाते. तरीही शेती व्यवसायात असणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

नामपूर (जि.नाशिक) : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने ‘अन्नदाता सुखी भव’ असे आदराने बोलले जाते. तरीही शेती व्यवसायात असणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिकसारख्या शेतीसधन जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात तब्बल एक हजार ३४७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

उत्तर महाराष्ट्रात एक हजार ३४७ शेतकऱ्यांची आत्महत्या 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखावर मायेचा हात फिरविण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज झाले असून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी ‘उभारी’ हा कार्यक्रम उत्तर महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. त्यानुसार संबंधित कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना आत्मसन्मानाने जीवन व्यतीत करता यावे, हा यामागचा उद्देश आहे. 
शासन नियमात बसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकार एक लाख रुपयांची मदत करते. परंतु कुटुंबप्रमुख गेल्यानंतर अनंत अडचणींचा सामना त्यांच्या परिवाराला करावा लागतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय गमे यांनी घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होईल. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

महसूल विभागाकडून कुटुंबीयांना ‘उभारी’तून दिलासा देण्याचा प्रयत्न 
शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबांची काय अवस्था झाली, याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. शेतकरी कुटुंबांची शासकीय कार्यालयात अडवणूक झाल्यास तहसील कार्यालयात तक्रार करावी. -जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 
अशा आहेत शेतकऱ्यांसाठी योजना 
* वैरण विकास योजना 
* राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना 
* महात्मा फुले जनआरोग्य योजना 
* समृद्धी महाराष्ट्र जनकल्याण योजना 
* बळीराजा चेतना अभियान 
* शेळी गट योजना 
* बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना 
* सामुदायिक विवाह सोहळा योजना 
* महात्मा गांधी रोजगार हमी योजना 

तालुकानिहाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या : 
* मालेगाव ५३ 
* बागलाण ३७ 
* निफाड ३१ 
* दिंडोरी ३१ 
* नांदगाव २७ 
* चांदवड १९ 
* सिन्नर १४ 
* येवला १२ 
* कळवण १२ 
* देवळा ७ 
* नाशिक ४ 
* त्र्यंबकेश्वर ४ 
* इगतपुरी २ 
* पेठ १ 
* सुरगाणा १  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers commit suicide in North Maharashtra nashik marathi news