शेतकऱ्यांनो रब्बीसाठी शुभसंकेत! मुबलक पावसामुळे यंदा पॅटर्न बदलणार

संतोष विंचू
Monday, 26 October 2020

अर्ध्यावर जिल्ह्यात रब्बी हंगाम पावसावर अवलंबून असतो. यंदा अद्यापही पावसाची हजेरी सुरू असून, खरिपाच्या पिकांची नासधूस या पावसाने चालवली असली तरी त्यामुळे रब्बीसाठी शुभसंकेत मिळाले आहेत

येवला (जि.नाशिक) : अर्ध्यावर जिल्ह्यात रब्बी हंगाम पावसावर अवलंबून असतो. यंदा अद्यापही पावसाची हजेरी सुरू असून, खरिपाच्या पिकांची नासधूस या पावसाने चालवली असली तरी त्यामुळे रब्बीसाठी शुभसंकेत मिळाले आहेत. यंदा सर्वदूर रब्बीची पिके घेतली जाणार असून, रब्बीतही जिल्हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून पुढे येईल. विशेषतः यंदा पीक पॅटर्न बदललेला दिसेल. गव्हासह उन्हाळ कांदा, हरभरा आणि मक्याचे क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. 

रब्बीतही जिल्हा बागायतदारांचा!
जिल्हा तसा खरिपाचा जिल्हा असून, खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३५ हजार असताना रब्बीचे क्षेत्र मात्र एक लाख १२ हजार ९१६ हेक्टर आहे. तर एक हजार ६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावेच रब्बी हंगामाची आहे. दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या. या वर्षी पावसाळा संपत आला तरी पाऊस पडत असल्याने सर्वत्र भूजल पातळी वाढली असून, जलसाठे तुडुंब आहे. याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याने या वर्षी जिल्ह्यात क्षेत्र वाढणार तर आहेच, पण पॅटर्नही बदलताना दिसेल. विशेषतः कांदा, गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी मका पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना काही भागात तर रब्बी पेरणीची तयारीही सुरू झाली आहे. 

गव्हासह मका, कांदा क्षेत्र वाढणार 
जिल्ह्यात धरण, कालवा लाभक्षेत्र मर्यादित असून, विशेषतः पावसाच्या पाण्यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दिवाळीच्या दरम्यान चांगला पाऊस होतो ते वर्ष रब्बीसाठी फलदायी असते, अन्यथा अर्धा जिल्हा रब्बीपासून दूरच असतो. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांना तर दर दोन किंवा तीन वर्षांच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ येते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील रचना विषमतेची असून, अनेक भागात कालव्याचे पाणी पोचलेले नाही. जोडीनेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने त्या परिसरात फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे. या वर्षी अद्यापही छोटे- मोठे बंधारे भरलेले आहेत. धरणांच्या क्षेत्रात कमी पाऊस असला तरी पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने मिळणारच आहेत. त्यामुळे या वर्षीचा रब्बी भरवशाचा ठरणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पर्जन्यमान व परिस्थितीनुसार पिकांचे क्षेत्र ठरते. या वर्षी डोंगरळ, अवर्षणप्रवण भागातही पिके निघणार असल्याने जिल्हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून दिसेल. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

तेलबिया पिकांचे क्षेत्र घटते... 
जिल्ह्यात तेलबिया पिकांचे सरासरी २७५ हेक्टर क्षेत्रांवर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात करडई ५६ हेक्टर, जवस एक हेक्टर, सूर्यफूल चार हेक्टर क्षेत्रावर असते. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून तेलबियांचे शेती शोधूनही सापडत नसून त्याऐवजी कांदे, भाजीपाला, मका पिकांचे प्रयोग वाढले आहेत. 

पीकनिहाय असे आहे सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टर) 
ज्वारी - ५,७५५ 
गहू - ६९,९६७ 
मका - २,५१६ 
हरभरा - ४१,१८४ 
इतर डाळ पिके - ९६८ 
तृणधान्य - ७०,७६७ 
कडधान्य - १,१२,९१६ 
तेलबिया - २७५  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farming pattern will change this year due to rains nashik marathi news