Coronaupdate : जिल्ह्यात पन्नास हजार रुग्ण कोरोनामुक्‍त; तर दिवसभरात सोळा रुग्णांचा मृत्‍यू

अरुण मलाणी
Sunday, 20 September 2020

दरम्यान, महापालिका व पंचायत समितीतर्फे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी तपासणी सुरू झाली आहे. मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांत नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याचे आढळून येत आहे. शनिवारी (ता. १९) पुन्‍हा एकदा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या पंधराशेहून अधिक राहिली. एक हजार ३८७ नवीन बाधित आढळून आले असून, एक हजार ६४२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सोळा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

एक हजार १५५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू

कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांच्‍या संख्येने पन्नास हजारांचा आकडा ओलांडला असून, आतापर्यंत ५१ हजार २६१ बाधितांना आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार २३२, ग्रामीणचे ४००, मालेगावचे पाच, तर जिल्‍हाबाह्य पाच रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८७९, ग्रामीणचे ४४२, मालेगावचे ४७, जिल्‍हाबाह्य १९ रुग्‍णांचा समावेश आहे. सोळा मृतांमध्ये नाशिक शहरातील सहा, नाशिक ग्रामीणचे आठ, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्ह्या‍तील एकूण बाधितांचा आकडा ६२ हजार ५०७ झाला आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ५१ हजार २६१ इतकी आहे. एक हजार १५५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

दहा हजार ९१ रुग्‍णांचा कोरोनाशी लढा

सद्यःस्‍थितीत दहा हजार ९१ रुग्‍ण कोरोनाशी लढा देत आहेत. 
दरम्‍यान, शनिवारीदेखील संशयित रुग्‍णांची संख्या लक्षणीय राहिली. नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ८६८ संशयित दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १०८, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १९, जिल्‍हा रुग्‍णालयात दहा संशयित दाखल झाले आहेत. 

मालेगाव परिसरात सहा जणांचा मृत्यू 

मालेगाव : शहरातील तिघा कोरोनाबाधित वृद्धांसह परिसरातील तीन, असे एकूण सहा मृत्यू शनिवारी (ता. १९) झाले. महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये या संशयितांवर उपचार सुरू होते. शहरातील सोयगाव भागातील ८५ वर्षीय, कलेक्टरपट्टा भागातील ६१ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष, द्याने येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित महिला, हाताणे येथील ६५ वर्षीय निगेटिव्ह असलेली महिला, नामपूर येथील ७५ वर्षीय संशयित महिला व ५० वर्षीय संशयित पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबळींची संख्या १४१, तर तालुक्यातील ४३ झाली आहे.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोना प्रतिबंधक फलक काढून क्वारंटाईन कुटुंब फिरतयं गावभर; नागरिकांना भरली धडकी

आज नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्ण मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. नव्याने ४७ रुग्ण आढळून आले. दरम्यान, महापालिका व पंचायत समितीतर्फे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी तपासणी सुरू झाली आहे. मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.  

हेही वाचा > प्रशासनाचा भोंगळ कारभार! स्‍वॅबचा अहवाल प्राप्त नसूनही रुग्णांवर उपचार; धक्कादायक खुलासा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty thousand corona free in the nashik district nashik marathi news