नव्या वर्षात अहिराणी गीतांची उत्तर महाराष्ट्राला मेजवानी; ८ महिन्यांनंतर चित्रीकरण सुरू

गोकुळ खैरनार 
Sunday, 29 November 2020

खानदेशचा बाज असलेल्या अहिराणी गीतांचे चित्रीकरण पुन्हा धूमधुडाक्यात सुरू झाले आहे. लॉकडाउनमुळे आठ महिन्यांपासून दोनशेपेक्षा अधिक अहिराणी कलावंत चित्रीकरणापासून दूर होते. लग्नसोहळे व सार्वजनिक समारंभ होऊ लागल्याने तसेच कोरोना नियंत्रणात येत असल्याने नव्या वर्षात नवीन अहिराणी गीतांची धून पुन्हा उत्तर महाराष्ट्रच्या कानी पडेल.

मालेगाव (नाशिक) : खानदेशचा बाज असलेल्या अहिराणी गीतांचे चित्रीकरण पुन्हा धूमधुडाक्यात सुरू झाले आहे. लॉकडाउनमुळे आठ महिन्यांपासून दोनशेपेक्षा अधिक अहिराणी कलावंत चित्रीकरणापासून दूर होते. लग्नसोहळे व सार्वजनिक समारंभ होऊ लागल्याने तसेच कोरोना नियंत्रणात येत असल्याने नव्या वर्षात नवीन अहिराणी गीतांची धून पुन्हा उत्तर महाराष्ट्रच्या कानी पडेल.

खानदेशची अहिराणी गीते जोरात

अलीकडच्या काही वर्षांपासून लग्नसोहळ्यांमध्ये खानदेशची अहिराणी गीतेच भाव खात आहेत. आजही ‘बबल्या इकस केसावर फुगे’, ‘लगीनमा मचाडू धूम’, ‘सावना महिना मा-राणी तुला प्यार करना यं’ आदी खानदेशी गाणेच आघाडीवर आहेत. खानदेशात अहिराणी गीतांचे सादरीकरण करणारे दहा ते पंधरा ग्रुप आहेत. एका ग्रुपमध्ये दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, गायक, गीतकार, कलावंत, कोरिओग्राफर, मेकअप मन, सहाय्यक कलावंत अशा पंचवीस ते तीस जणांचा समावेश असतो. चित्रीकरणाला सुरवात झाल्याने या व्यवसायाशी निगडित विविध घटकांचा रोजीरोटीचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे. अहिराणी गीतांबरोबरच देवी-देवतांवर आधारित गीतांचे सादरीकरण केले जाते.

अहिराणी भाषेची उंची वाढणार

गेल्या दशकापासून अहिराणी मायबोलीतील ही गीते ग्रामीण भागाबरोबरच मोठ्या शहरातही धुमाकूळ घालत आहेत. मध्य प्रदेश, गुजरातला या गीतांची बऱ्यापैकी रेलचेल आहे. विशेष म्हणजे गीतांचे सादरीकरण करणाऱ्या तरुणाईचा समावेश आहे. यातून अनेक गायक, कलावंत उदयास येत आहेत. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अनेक गीतांना एक कोटीपेक्षा अधिक विव्ह मिळाले आहेत. ‘केसावर फुगे’ या गीताने तर यशाचे शिखर गाठले आहे. लोकप्रिय गीतांमुळे अहिराणी भाषेची वाढणारी उंची खानदेशवासीयांना अभिमानास्पद ठरत आहे.

आजवर लोकप्रिय झालेली अहिराणी गीते अशी 

*बबल्या इकस केसावर फुगे, * लगीनमा मचाडू धूम, * सावना महिना मा, * हाई टमटम टमटम चाली राहिनी, * कपाशी येचाले गवू मी वावरमा, * वाकाड बबल्या, * गोट्यान लगीन, * खान्देशनी जत्रा मा माले काय काय ली दिसी, *ओ साली प्यार करना यं, * रथ काय चालना वनी ना गडले, * वनी गडले बंगला बांधा, * भलतीच आथी तथी फिरे व माय
 

लॉकडाउननंतर आम्ही पुन्हा चित्रीकरणास सुरवात केली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला नवीन गाणी येतील. इतर गाण्यांप्रमाणेच चाहत्यांकडून या गाण्यांनाही मोठी लोकप्रियता मिळेल, असा विश्‍वास आहे.
-सचिन कुमावत - कलावंत, शेंदुर्णी, जि. जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filming of Ahirani songs resumes nashik marathi news