अतिवृष्टी, सायक्‍लोनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या पेपरला स्थगिती; पुणे विद्यापीठाचा निर्णय

अरुण मलाणी
Friday, 16 October 2020

विद्यापीठानेच पुढाकार घेत निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. विद्यापीठाच्या सूचनेत केवळ एकाच दिवसाचा उल्लेख असल्याने गुरुवार (ता. १६)पासून नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार आहेत. 

नाशिक : राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी व सायक्‍लोनमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी (ता. १५) नियोजित असलेल्या अंतिम वर्ष परीक्षेच्या विविध विषयांच्या पेपरला स्थगिती दिली. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पेपरला स्थगिती देत असून, या पेपरचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

गुरुवारपासून नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार

परतीच्या पावसाने विविध परिसरांना झोडपले आहे. पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलत असल्याची सूचना जारी केली आहे. दरम्यान, दिवसभरात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी विजेचा लपंडावही सुरू असल्याचे बघायला मिळाले. विद्यापीठानेच पुढाकार घेत निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. विद्यापीठाच्या सूचनेत केवळ एकाच दिवसाचा उल्लेख असल्याने गुरुवार (ता. १६)पासून नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार आहेत. 

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

गुरुवारी होणार असलेल्या विविध अभ्यासक्रमांतील विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष परीक्षा देण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागला, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उद्भवलेली समस्या नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final year from Pune University Postponement to paper nashik marathi news