शेकडो वर्षांची परंपरा! अतिदुर्गम आदिवासी भागात आजही ‘पगडी फाळा’तून आर्थिक मदत

pagdli fala.jpg
pagdli fala.jpg

नाशिक : (सुरगाणा) तालुक्यातील पिंपळसोंड या अतिदुर्गम गावात गरजूंना आर्थिक मदतीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ‘पगडी फाळा’ ही पद्धत आजही डांग या आदिवासी भागात सुरू आहे. फाळा याचा अर्थ वर्गणी असा होतो. 

संकटावेळी एकमेकांना मदत

आदिवासी समाजाची जीवनशैली ही निसर्गासोबत सलोख्याने जगा अशी आहे. नैसर्गिक आपत्तीचे कितीही संकट आले तरी सामाजिक सलोख्याने जीवन जगणे, एकमेकांशी आदराने वागणे, मुलगा- मुलगी एक समान, संकटावेळी एकमेकांना मदत करणे अशा अनेक गोष्टी आजही आदिवासी खेडोपाडी प्रचलित आहेत. याच चांगल्या रुढी- परंपरा, संस्कृती, चालीरीती यांना कधी कधी अंधश्रद्धा असेही म्हटले जाते. पण या बारागाव डांगच्या सीमावर्ती भागात अनेक चांगल्या चालीरीती, परंपरा आजही जपल्या आहेत. त्यातीलच एक चांगली परंपरा तालुक्यातील पिंपळसोंड येथे सुरू आहे. 

श्रीमंत असो की गरीब निधी घेण्याचे बंधन

गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर आदिवासी परंपरेने अग्निडाग किंवा भुईडाग देऊन अंत्यविधी केला जातो. अंत्यविधी उरकल्यावर मौतीला (मृत्यूच्या वेळी) आलेले ग्रामस्थ हातपाय धुतल्यावर एका जागेवर थांबतात. त्याच ठिकाणी एक टॉवेल अंथरला जातो. त्यावर यथाशक्तीने पैसे टाकले जातात. पाच, दहा रुपयांपासून मदत केली जाते. सहजपणे दोन ते अडीच हजार रुपये जमा होतात. त्याला ‘पगडी फाळा’ असे म्हटले जाते. जमलेला निधी त्या कुटुंबाला तातडीचा मदतनिधी म्हणून ग्रामस्थांकडून कुटुंबातील सदस्याकडे सुपूर्द केला जातो. गावातील व्यक्ती श्रीमंत असो की गरीब हा जमा केलेला निधी प्रत्येकाला प्रथेनुसार घ्यावाच लागतो. 

आर्थिक विवंचना दूर

या निधीतून दशक्रिया विधीचा खर्च केला जातो. त्यामुळे अत्यंत गरजू व गरीब कुटुंबाला आर्थिक हातभार मिळतो. म्हणून ही तरतूद ग्रामस्थांकडून तातडीने उपलब्ध केली जाते. यातून थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत होत असल्याने आर्थिक विवंचना दूर होते. ही अनोखी परंपरा आजही अविरतपणे या भागात पाहावयास मिळते. आदिवासी बांधवांमध्ये आजही सामाजिक बांधिलकी जपली जात असून, ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या सुभाषिताचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. 

आमच्या गावी ‘पगडी फाळा’ ही पद्धत शेकडो वर्षांपासून अविरतपणे वाडवडिलांपासून सुरू आहे. आज आमचा समाज कितीही प्रगत झाला असला तरी गावातील गरजू कुटुंबाला तातडीचा आर्थिक हातभार लागावा म्हणून याचा फायदा होतो. हा पैसा स्वेच्छेने आम्ही जमा करतो. ही एक सहकार्याची बाब असल्याने आम्ही ती बंद करू शकत नाही. याकडे आम्ही चांगली परंपरा म्हणून बघतो. - महादू खोटरे, ज्येष्ठ नागरिक, पिंपळसोंड 

(संपादन : भीमराव चव्हाण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com