'पीपीई किट'संदर्भात नुकतेच झाले महत्वपूर्ण संशोधन...प्राध्यापक तुषार देशपांडे यांचा शोध!

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

विशिष्ट आकाराची सच्छिद्रता असल्यास विषाणूला अवरोध व हवेचे अभिसरण होऊ शकते, अशा नवीनतम सूक्ष्मातील सच्छिद्र पातळ आवरणाचे संशोधन करून त्याचे पेटंट प्राप्त केले आहे. हे संशोधन केले आहे ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक तथा संशोधक प्रा. तुषार देशपांडे यांनी.

नाशिक : सद्यःस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढाईत पीपीई किटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु प्रचलित पीपीईमध्ये हवेचे अभिसरण शक्‍य नसल्याची बाब पुढे आली आहे. या समस्येचे निरकारण करणारे संशोधन नुकतेच झाले आहे. हे संशोधन केले आहे ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक तथा संशोधक प्रा. तुषार देशपांडे यांनी...

पीपीईनिर्मितीसाठी अतिसूक्ष्म सच्छिद्र पातळ आवरण
 
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूर येथे केमिकल इंजिनिअरिंगचे प्रा. योगेश जोशी व केंद्राचे भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुषार देशपांडे यांनी त्यांच्या पीएच.डी. संशोधनादरम्यान डॉ. संदीप पाटील आणि योगेश ठाकूर यांच्यासमवेत तयार केलेल्या अभिनव ‘लवचिक सूक्ष्मातीत सच्छिद्र पातळ आवरणाच्या (microporous elastomeric thin films) उत्पादन प्रक्रियेसाठीचे नुकतेच पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे. 

काय आहे आवारण 

अभिनव पातळ आवरणाची सच्छिद्रता (porosity) अतिशय सूक्ष्मतीत (छिद्रव्यास २ ते ५ मायक्रॉन) असून, ते विविध जाडीमध्ये (०.१५० ते १ मी.मी.) तयार करता येते. हे जलरोधक (water repellant ) पातळ आवरण पॉलिडाय मिथाइल सिलॉक्‍ससेन (PDMS), इथाइल असिटेट आणि पाणी वापरून तयार केलेले असल्याने याची उत्पादनप्रक्रिया पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी आहे. एक साधे, स्केलेबल आणि कमी किमतीच्या तंत्राने निर्मित या पातळ आवरणातील (thin films) अतिशय लहान छिद्रांमुळे हवेचे व पाण्याचे अभिसरण शक्‍य असून, जिवाणू व विषाणू यांना अवरोध होऊ शकतो. यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टीमध्ये या आवरणाचा उपयोग होऊ शकतो. जसे यापासून सच्छिद्र जलरोधक जखमेवरील मलमपट्टी (Bandages) बनवल्यास या छिद्रांमध्ये औषधी साठवता येईल.

कोरोनायोद्ध्यांसाठीच्या पीपीई किट बनविण्यासाठी उपयोग

योग्य वेळेस (फक्त काही प्रमाणात दाब देऊनही) जखमेवर त्याचे वितरण होऊ शकेल. शिवाय याच्यामधून हवेचे वहन शक्‍य असल्याने जखम लवकर बरी होऊ शकते. याशिवाय जिवाणू व विषाणूरोधक आवरणकरिता व हॉस्पिटल्समध्ये ऊतक अभियांत्रिकी (Tissue Engineering ) मध्ये शरीरातील पेशी वाढवून त्यापासून अवयव बनविण्यासाठी, स्ट्रेचेबल बायोइलेक्‍ट्रॉनिकमध्ये, बायोगॅससाठी अर्ध-पारगम्य पडदा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितित याचा कोरोनायोद्ध्यांसाठीच्या पीपीई किट बनविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ही शक्‍यता तपासली जात आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

कुठे होऊ शकतो उपयोग 

- नवीनतम सच्छिद्र जलरोधक मलमपट्टी बनविणे 
- जिवाणू व विषाणूरोधक आवरणकरिता व हॉस्पिटल्समध्ये 
- शरीरातील पेशी वाढवून त्यापासून अवयव बनविण्यासाठी आधारभूत पदार्थ बनविण्यासाठी 
- स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स 
- एअर फिल्टर  

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fine porous thin coating for PPE production; Assistant Professor Researcher Patent nashik marathi news