दिलासादायक! जिल्ह्यात दिवसभरात प्रथमच सतराशेहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; वाचा कोरोना सद्यस्थिती

अरुण मलाणी
Friday, 18 September 2020

मालेगावचे २२ आणि जिल्हाबाह्य आठ रुग्ण आहेत, तसेच १९ मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील पोलिस कर्मचाऱ्यासह सात, ग्रामीण भागातील आठ आणि मालेगाव महापालिका रुग्णालयातील चार रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार ५८५ झाली आहे. यांपैकी ४८ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना, बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १७) दिवसभरात एक हजार ७१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, तर दिवसभरात एक हजार ५९७ नवीन कोरोनाबाधित आढळले. 

नव्याने आढळले एक हजार ५९७

१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, पोलिस आयुक्‍तालयातील बिनतारी संदेश विभागातील (वायरलेस) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भदाणे (वय ५४) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. गुरुवारी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या विक्रमी राहिली. यात नाशिक शहरातील एक हजार ११७, नाशिक ग्रामीणचे ४७६, मालेगावचे ११९, तर जिल्हाबाह्य सहा रुग्णांचा समावेश आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार २१, नाशिक ग्रामीणचे ५४६, मालेगावचे २२ आणि जिल्हाबाह्य आठ रुग्ण आहेत, तसेच १९ मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील पोलिस कर्मचाऱ्यासह सात, ग्रामीण भागातील आठ आणि मालेगाव महापालिका रुग्णालयातील चार रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार ५८५ झाली आहे. यांपैकी ४८ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

गृहविलगीकरणात एक हजार ६८४

एक हजार १२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दहा हजार ३३६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरीकडे संशयित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार ६८४, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात १२४, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात ३०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३०, तर जिल्हा रुग्णालयात सात संशयित दाखल झाले आहेत. 

शहर पोलिस दलातील पाचवा बळी 

दोन दिवसांपूर्वीच नाशिक रोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले राजेंद्र ढिकले (वय ५०) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भदाणे (वय ५४) यांचे कोरोनामुळे निधन झाले. शहर पोलिस आयुक्‍तालयातील पोलिसांच्या बळींची संख्या यातून पाचवर पोचली आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 मालेगावला चौघांचा मृत्यू 

मालेगाव : शहर व परिसरात गेल्या २४ तासांत महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना शहरातील तिघे कोरोनाबाधित व मनमाड येथील एक संशयित अशा चौघांचा मृत्यू झाला. यात दोन पुरुष, दोन महिलांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबळींची संख्या १३७, तर तालुक्यातील ४२ झाली आहे. आज नव्याने २६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील २२ रुग्ण शहरातील, तर उर्वरित चौघे ग्रामीण भागातील आहेत. शहरातील ६१९, तर तालुक्यातील २९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज नव्याने ३० रुग्ण दाखल झाले. महापालिका कार्यक्षेत्रातील २०० अहवाल प्रलंबित आहेत, तर शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७६ वरून ७८.८९ वर गेली आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in a day in the district, more than seventeen hundred patients were corona free nashik marathi news