सिन्नर घाटात रानफुलांची पखरण; पिवळ्याजर्द फुलांच्या सान्निध्यात प्रवास होतोय सुखद! पाहा PHOTOS

अजित देसाई
Sunday, 11 October 2020

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करत असताना सिन्नरच्या मोहदरी घाटातील वळणांचा रस्ता अबाधित ठेवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथील निसर्गसौंदर्य जपले आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतरचे काही महिने हा घाटमार्ग निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघत असतो.

नाशिक/सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर दरम्यान असणाऱ्या मोहदरी घाटात गेल्या काही दिवसांपासून निसर्गसौंदर्याची अद्भुत उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते आहे. हिरवाईने नटलेल्या घाट रस्त्यालगत पिवळ्याधम्मक आणि केशरी फुलांची अक्षरशः चादर पसरली असून रानफुलांच्या या पखरणीमुळे घाटातील वळणांचा प्रवास सुखद अनुभूती देणारा ठरतो आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करत असताना सिन्नरच्या मोहदरी घाटातील वळणांचा रस्ता अबाधित ठेवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथील निसर्गसौंदर्य जपले आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतरचे काही महिने हा घाटमार्ग निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघत असतो. मोहदरी, जामगाव, पास्ते परिसरातील डोंगरांचे विहंगम दृश्य पावसाळ्यात डोळ्यात साठवावे असेच असते. संपूर्ण हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्यांचा वेध घेणाऱ्या उंचच उंच पवनचक्क्या या सौंदर्यात भर घालत असतात. तर गेल्या पाच-सात वर्षांपासून घाट रस्त्याच्या दुतर्फा फुलणारी पिवळीजर्द केशरी रंगाची रानफुले जणू हिरव्या गालिच्यावर अंथरलेली मखमली चादर वाटतात. झेंडूच्या फुलांच्या जातकुळीशी साधर्म्य सांगणारी ही फुले गेल्या महिनाभरापासून फुलली असून प्रवाशांसाठी हे अवर्णनीय आकर्षण ठरले आहे. 

सेल्फी पॉइंट

सातारा जिल्ह्यातील कासचे पठार विविधरंगी फुलांचा उधळणीसाठी जगप्रसिद्ध आहेत. याच धर्तीवर सिन्नर घाटात रस्त्याच्या दुतर्फा फुलांची उधळण बघायला मिळते आहे. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी आणि या फुलांच्या सानिध्यात घालवलेले क्षण चित्रबद्ध करण्यासाठी प्रवाशांची पावले थांबली नाही तर नवलच. घाट मार्गातील ही रानफुले सध्या सेल्फी पॉइंट ठरली असून रस्त्याने जाणारे-येणारे प्रवासी सहकुटुंब थांबून या फुलांच्या पार्श्‍वभूमीवर फोटोसेशन करून घेतात दिसत आहेत. या रानफुलांचा हंगाम अवघ्या दीड महिन्यांचा असून त्यानंतर ती हळूहळू कोमेजत जाऊन आपले अस्तित्व हरवून बसतील ते थेट पुढच्या पावसाळ्यात पुन्हा डोळ्यांना सुखद अनुभूती देण्यासाठी.

पिवळा कॉसमॉस म्हणून ओळख

सिन्नर घाटात लगडलेली ही रानफुले सल्फर कॉसमॉस किंवा पिवळा कॉसमॉस म्हणून ओळखली जातात. त्याचे मूळ मेक्सिको, मध्य आणि उत्तर अमेरिकेत असून युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात नैसर्गिक उगवण आढळते. झेंडूशी साधर्म्य सांगणारया या वनस्पतीची फुले पिवळ्या आणि केशरी रंगाची असतात. 90 ते 110 सेंटीमीटर पर्यंत वाढणारी झाडाची उंची, फुलांचे तोंड सूर्याच्या दिशेने असते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुलांचा बहर असतो. मधमाशी आणि फुलपाखरांना आकर्षित करणारी ही फुले आहेत.स्वतःच्या पेरणीतून पावसाळ्यात झाडे उगवतात.

छायाचित्र - कैलास नवले

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers are blooming in Sinnar Ghat nashik marathi news