त्यांच्या हातात जादूच! पक्षाला हुबेहुब रेखाटता कागदावर; वन संरक्षकाची वाखण्याजोगी कला

महेंद्र महाजन
Monday, 30 November 2020

अनेक ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ते सहभागी झालेत. अभयारण्याचा पूर्ण परिसर फिरावा लागत असल्याने त्यांना विविध प्रकारचे पक्षी जवळून पाहावयास मिळू लागले. त्यांच्या हालचाली, रंग, आवाज हे सर्व ते जवळून बघत होते. त्यामुळे अनेक पक्ष्यांची ओळख होत गेली.

नाशिक : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील संरक्षक पथकातील प्रमोद पाटील यांनी निसर्ग चित्रकलेची आवड जोपासलीय. ते शिक्षकाची नोकरी आर्थिक कारणामुळे सोडून वन विभागात रुजू झालेत. वीस वर्ष रंगांच्या दुनियेपासून लांब राहिल्यानंतर पुन्हा त्यांनी कला जिवंत करण्याचे ठरविले. त्यांनी विविध जातीच्या पक्ष्यांची तब्बल साठ चित्रे रेखाटली आहेत.

विविध ६० पक्ष्यांची चित्रे रेखाटलीत

लहानपणापासून निसर्गचित्रे ते काढत असत. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने घराजवळील चिमण्या, कावळे आदींचे चित्र ते काढू लागलेत. शिक्षण झाल्यावर ते नाशिक शहरालगतच्या एका इंग्रजी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून रुजू झालेत. पण आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नोकरी सोडली. मात्र निसर्गचित्रे त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी वन विभागात नोकरी स्वीकारली. अनेक ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ते सहभागी झालेत. अभयारण्याचा पूर्ण परिसर फिरावा लागत असल्याने त्यांना विविध प्रकारचे पक्षी जवळून पाहावयास मिळू लागले. त्यांच्या हालचाली, रंग, आवाज हे सर्व ते जवळून बघत होते. त्यामुळे अनेक पक्ष्यांची ओळख होत गेली. मग ते अभयारण्यात पेन्सिल आणि वही घेऊन जावू लागले. पक्ष्याला पाहून रेखाचित्र काढण्यास सुरवात केली.

जणू पक्षीच समोर बसलाय...

श्री. पाटील हे पक्ष्यांचे हुबेहुब चित्र साकारत असल्याने जणू पक्षीच समोर बसला असल्याचे जाणवते. त्यांनी शंभर पक्ष्यांची चित्रे रेखाटण्याचा संकल्प केला आहे. खंड्या, रोहित, नवरंग, मार्श हेरिअर, चक्रवाक, कॉमनक्रेन आदी पक्ष्यांची चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. चित्रांच्या माध्यमातून विविध गावांत, शाळेत विद्यार्थ्याना पक्ष्यांची ओळख करून देत पक्ष्यांचे महत्त्व समजून सांगतात. आतापर्यंत त्यांनी अनेक पक्षी वाचवले आहेत. मासेमारी करणाऱ्यांना ते पक्ष्यांचे महत्त्व पटवून देतात. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना ते पक्ष्यांची माहिती देत असतात.

प्रत्येक व्यक्तीला एक छंद असावा, असे मला वाटते. छंदामुळे शांती मिळते. मी आतापर्यंत विविध जातींचे पक्षी प्रत्यक्ष बघून त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून चित्रे काढली आहेत. भविष्यात चित्रप्रदर्शन भरविण्याची इच्छा आहे. - प्रमोद पाटील (वनसंरक्षक पथकातील कर्मचारी)

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Conservator took pictures of birds replica nashik marathi news