मालेगाव महापालिकेचे माजी महापौर नजमुद्दीन शेख गुलशेर यांचे निधन

najamuddin shaikh.jpg
najamuddin shaikh.jpg

नाशिक / मालेगाव : येथील माजी महापाैर नजमुद्दीन शेख गुलशेर उर्फ खजुरवाले (वय 63) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात चार मुले, चार मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जहीर शेख यांचे ते वडील होत.

पहिल्याच प्रयत्नात महापौरपदाची संधी
नजमुद्दीन शेख यांचा खजूर ठोक व किरकोळ विक्रीचा मोठा व्यवसाय असल्याने ते नजमुद्दीन खजुरवाले या नावानेच परिचित होते. सन 2007 मध्ये आमदार मौलाना मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी सर्वप्रथम महागटबंधन आघाडीची स्थापना केल्यानंतर कुठलेही राजकीय वलय नसलेल्या मात्र स्वकष्टावर व्यवसायात अग्रणी ठरलेल्या नजमुद्दीन खजुरवाले यांना गुलशानाबाद-रौनकाबाद प्रभागातून महागटबंधनची उमेदवारी दिली. प्रथमच निवडणूक लढविणारे खजुरवाले मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. पाठोपाठ महागटबंधन आघाडी व कॉंग्रेस युतीची महापालिकेत सत्ता स्थापन झाली. त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात त्यांना महापौरपदाची संधी मिळाली.

अरबी खजुर सेंटरचे मालक

जून 2007 ते डिसेंबर 2009 या दरम्यान त्यांनी महापौरपद भुषविले. या काळात त्यांना फारसे उल्लेखनीय काम करता आले नसले तरी मनमिळावू स्वभाव व सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती यामुळे व दोन प्रमुख राजकीय विरोधकच एकत्र आल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महासभा शांततेत पार पडल्या. खजुरवाले यांची ही पहिली व शेवटची निवडणूक होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले. त्यांनी आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. शहरातील प्रमुख किदवाई रस्त्यावरील अरबी खजुर सेंटरचे ते मालक होते. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com