'रासाका’ भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार निविदा; उपसमितीच्या निर्णयाकडे लक्ष

dilip bankar rasaka.jpg
dilip bankar rasaka.jpg

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : रासाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत शासनाने मागविलेल्या निविदा सोमवारी (ता. ११) उघडण्यात आल्या. त्यात पाचपैकी एक निविदा अपात्र ठरली आहे. तर आमदार दिलीप बनकर यांनी भरलेल्या पिंपळगाव बाजार समिती, स्व. अशोक बनकर पतसंस्था व भीमाशंकर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी अशा तीन आणि सचिन सावंत यांच्या द्वारकाधीश साखर कारखान्यात रासाका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी रस्सीखेच आहे. यात द्वारकाधीशचा प्रतिटन भाडेदर अधिक असल्याचे समजते. पण, शासनदरबारी आमदार बनकर यांचे वजन असल्याने रासाकाची सूत्रे कुणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता आहे. शासनाची उपसमिती कुणाच्या बाजूने कौल देते, याकडे लक्ष लागून आहे. 

उपसमितीच्या निर्णयाकडे लक्ष; द्वारकाधीश कारखान्यात रस्सीखेच 

निफाडच्या विधानसभा निवडणूक प्रचारात बंद असलेले रासाका व निसाका साखर कारखाने सुरू करण्याबाबत आमदार दिलीप बनकर यांनी आश्‍वासीत केले. त्या मुद्द्यावर निवडणुकीचे वारे बदलले अन्‌ आमदार बनकर यांनी बाजी मारली. पण, वर्ष उलटूनही साखर कारखाने सुरू करण्याबाबत हालचाली होत नसल्याने आमदार बनकर टीकेचे धनी झाले होते. अखेर गेल्या महिन्यात रासाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत साखर उपसमितीने निविदा मागविल्या. रासाका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदार बनकर यांनी कायद्यात दुरुस्ती करून साखर कारखाने सहकारी संस्थाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी परवानगी मिळवली. त्यानुसार विहित मुदतीत आलेल्या पाच निविदा पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयात उघडण्यात आल्या. 
या वेळी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या उपसमितीचे उत्तम इंदोलकर, मिलिंद भालेराव, आमदार दिलीप बनकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, स्व. बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, अवसायक राजेंद्र निकम यांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात आल्या. पाचपैकी एक निविदा निकषात नसल्याने बाद ठरविण्यात आली. तर उर्वरित चार निविदा पात्र ठरल्या आहेत. 

चारही निविदा उपसमितीकडे पाठविणार
त्यात आमदार बनकर यांच्या स्व. अशोक बनकर पतसंस्थेने ९१ रुपये, भीमाशंकर ॲग्रोने ८१ रुपये, तर पिंपळगाव बाजार समितीने ७१ रुपये प्रतिटन असा भाडेतत्त्वाचा दर भरला आहे. सचिन सांवत यांच्या सटाणा येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने सर्वाधिक १११ रुपये निविदेचा दर आहे. या चारही निविदा उपसमितीकडे पाठविल्या जाणार आहेत. 

रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारणार 
आमदार बनकर यांच्या तीन संस्थांच्या तुलनेत द्वारकाधीशचा दर उंच आहे. पण गेल्या पंधरा वर्षांत बाहेरून आलेल्या साखर कारखान्यांनी रासाका व सभासदांना पैसे न देता धूम ठोकली. यात छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याकडून उपकराराने द्वारकाधीशनेही वर्षभर रासाका चालविला आहे. मागील इतिहास पाहता द्वारकाधीशचा दर सर्वाधिक असूनही अडसर ठरू शकतो. 
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

निफाड तालुक्याची चूल असलेले साखर कारखाने सुरू करण्याच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दपूर्तीकडे एक पाऊल टाकले आहे. कायद्यात बदल करून मी तीन संस्थांच्या निविदा भरल्या. रासाका ऊर्जितावस्थेत येऊन ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. उपसमिती जो निर्णय घेईल तो मान्य राहणार आहे. -दिलीप बनकर, आमदार, निफाड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com