राष्ट्रपुरुषाचा पुतळा बसविल्याप्रकरणी बोलठाणमध्ये चौदा जणांना अटक 

संजीव निकम
Saturday, 14 November 2020

दुसरीकडे पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत माहिती कळताच मनमाडचे पोलिस उपअधीक्षक साळवे तातडीने बोलठाणला दाखल झाले. तरीही तोडगा निघत नसल्याने दक्षता म्हणून अतिरिक्त पोलिसांची कुमुक बंदोबस्तासाठी मागविली

नाशिक/नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे ग्रामपंचायतीच्या जागेत विनापरवानगी राष्ट्रपुरुषाचा पुतळा बसविल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.१३) चौदा जणांना अटक झाली असून, त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, बोलठाण येथे बुधवारी (ता.११) रात्री अज्ञात व्यक्तींनी शासकीय जागेत पुतळा आणून बसविल्यामुळे गावात काही काळ निर्माण झालेला तणाव पोलसांनी केलेल्या कारवाईमुळे शुक्रवारी निवळला.

विनापरवानगी बसविला राष्ट्रपुरुषाचा पुतळा

पोलिसांनी याप्रकरणी गावातल्या एकूण चाळीसहून अधिक महिला व पुरुषांना ताब्यात घेऊन चौकशीसत्र राबविले. त्यातून चौदा जणांवर अटकेची कारवाई झाली. गुरुवारी (ता.१२) रात्री उशिरापर्यंत बोलठाणच्या या घटनेमुळे महसूल व पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. गावातल्या शासकीय जागेवर अज्ञातांनी राष्ट्रपुरुषाचा पुतळा अचानकपणे व विनापरवानगी बसविल्याने पोलिसांसह महसूल यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

काही काळ तणावाचे वातावरण निर्माण

माहिती कळताच तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे व गटविकास अधिकारी गणेश चौधरी बोलठाणला दाखल झाले. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट आहे. तहसीलदार कुलकर्णी यांनी शासकीय परिपत्रकाचा संदर्भ देत शासकीय जागेवर विनापरवानगी पुतळा बसविता येत नसल्याची भूमिका स्पष्ट केली. मात्र पुतळा बसविला कोणी, यापेक्षा तो हलवू नये, यासाठी पुतळा समर्थकांनी भूमिका स्वीकारल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बसविलेला पुतळा पोलिसांनी सुरक्षितरीत्या काढून घेतल्यावर बोलठाणमधील वातावरण काही काळासाठी तणावाचे बनले व पुतळा समर्थकांनी घोषणाबाजी करीत पुतळा हलवू नये, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल
दुसरीकडे पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत माहिती कळताच मनमाडचे पोलिस उपअधीक्षक साळवे तातडीने बोलठाणला दाखल झाले. तरीही तोडगा निघत नसल्याने दक्षता म्हणून अतिरिक्त पोलिसांची कुमुक बंदोबस्तासाठी मागविली. सायंकाळी उशिरा मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवीही नांदगावला दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत पुतळा समर्थकांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen people arrested in Bolthan for installing statue nashik marathi news