शेतकरी बॅकफुटवर...'पावसाळी झेंडूचे पीक घ्यावे की नाही?'...द्विधा मनःस्थिती

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

लॉकडाउनमुळे राज्यातील पॉलिहाऊस, नेटशेड व खुल्या जागेवरील फुलांचा सुगंध शेतातच कोमजला. ऐन हंगामात 15 हजार हेक्‍टर फुलशेतीला फटका बसला असून, पाचशे कोटीचे नुकसान झाले आहे. देवस्थाने, लग्न सोहळे, सार्वजनिक समारंभ बंद झाल्याने फुलांवर अवलंबून असलेल्या 50 हजार जणांचा रोजगारही गेला आहे.

नाशिक/मालेगाव : लॉकडाउनमुळे राज्यातील पॉलिहाऊस, नेटशेड व खुल्या जागेवरील फुलांचा सुगंध शेतातच कोमजला. ऐन हंगामात 15 हजार हेक्‍टर फुलशेतीला फटका बसला असून, पाचशे कोटीचे नुकसान झाले आहे. देवस्थाने, लग्न सोहळे, सार्वजनिक समारंभ बंद झाल्याने फुलांवर अवलंबून असलेल्या 50 हजार जणांचा रोजगारही गेला आहे.

ऐन हंगामात लॉकडाउन 

देवस्थान सुरू होण्याची कमी शास्वती, आगामी गणेशोत्सव, नवरात्रोस्तव व दिवाळी जेमतेमच राहण्याची चिन्हे दिसत असल्याने पावसाळी झेंडूचे पीक घेण्यासंदर्भात शेतकरी बॅकफुटवर आले आहेत. पावसाळी झेंडूचे पीक घेण्यास नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात फुलांचा हंगाम वर्षभर असतो. मात्र, फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात खरा सुगंध दरवळतो. राज्यात पाच हजार हेक्‍टर पॉलिहाऊस, तीन हजार हेक्‍टर नेटशेड तर सात हजार हेक्‍टर खुल्या जमिनीवर फुलशेती केली जाते. मार्च ते मेदरम्यान पर्यटनामुळे देवस्थाने फुलून जातात. याच कालावधीत लग्न सोहळ्यांची धूम असते. गावागावांच्या यात्रा-जत्रांमध्ये फुलांचा सुगंध दरवळतो. कोरोनाने सर्वांना घरात कोंडले. आणि बळीराजाला दुधाच्या सायेप्रमाणे जपलेली फुले तोडून शेतातच फेकावी लागली. उलट फुले तोडणीचा खर्च वाढला. 

या जिल्ह्यांमध्ये होते फुलशेती 

राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, सांगली, सातारा, नागपूर, नांदेड या जिल्ह्यात फुलशेती केली जाते. एकट्या पुण्यातून रोज 24 लाख फुले इतरत्र जातात. पॉलिहाउसमधील जवळपास निम्मी फुले उत्तर भारतात जातात. यंदा होळीमुळे फुल बाजारावर 15 दिवस परिणाम झाला. त्यानंतर सुरू झालेला बाजार लॉकडाउनमुळे आठवड्यातच बंद पडला. उत्पादन खर्च जास्त असल्याने पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खते, फवारणीचा खर्चही निघाला नाही. लॉकडाउनने फुलशेतीचे कंबरडेच मोडले आहे. 

पावसाळी झेंडूबाबत द्विधा मनस्थिती 

राज्यातील 15 हजार हेक्‍टरपैकी सर्वाधिक साडेसात ते आठ हजार हेक्‍टरवर झेंडू, प्रत्येकी दीड हजारवर गुलाब व जरबेरा आहेत. झालेले नुकसान पाहून पावसाळी झेंडूबाबत शेतकऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. दसरा व दिवाळी डोळ्यासमोर ठेवून जुलैमध्ये झेंडूची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड आदी भागांत झेंडूचे पीक घेतले जाते. यंदा लागवड हमखास घटू शकेल. 

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना

शेतातील पॉलिहाउसमध्ये 25 हजार गुलाबाची झाडे होती. उत्तर भारतात फुले जाणार होती. लॉकडाउनमुळे मजूर लावून फुले तोडून फेकावी लागली. स्प्रे व खतांचा खर्च वाचविण्यासाठी झाडांना री-कट केले. निसर्ग वादळात पॉलिहाउस फाटले. एकूण दहा लाखांचे नुकसान झाले. - चंद्रकांत बोरसे शेतकरी, कजवाडे (ता. मालेगाव)

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fragrance of flowers on 15 thousand hectares in Maharashtra is wither in the fields nashik marathi news