वीर जवान अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप

Funeral of late army jawan Kuldeep Jadhav
Funeral of late army jawan Kuldeep Jadhav

सटाणा (नाशिक) :  पिंगळवाडे,(ता. बागलाण) येथील जवान कुलदीप जाधव यांच्यावर आज (ता.२४) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यातआले. अमर रहे !अमर रहे!! वीर जवान कुलदीप अमर रहे!!! च्या घोषणाबाजीत पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप दिला. जयेश जाधव याने जवान कुलदीप यांना अग्नीडाग दिला. यावेळी मयत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून हंबरडा फोडून रडणाऱ्या त्यांच्या पत्नी नीलम यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

घोषणांनी दुमदुमला शहर व परिसर 

शनिवार (ता.२१) रोजी जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये कडाक्याच्या थंडीत झोपेतच मृत्यू झाला होता. आज सकाळी नऊ वाजता कुलदीप यांचे पार्थिव सटाणा शहरात दाखल होताच शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा भाक्षी रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानापर्यंत कुलदीपच्या अंतिम दर्शनासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. चारफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थेट ताहाराबाद रस्त्यामार्गे भाक्षी रोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून नेण्यात आला. यावेळी चौकाचौकात शवपेटी थांबवून पार्थिवावर विविध पक्ष संघटना, गणेश मित्र मंडलांकडून पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. यावेळी अमर रहे, अमर रहे, कुलदीप जाधव अमर रहे...भारत माता की जय च्या घोषणांनी शहर व परिसर दुमदुमून गेला होता. 

कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत

धुळ्याचे खासदार व माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे(पाटील) यांनी कुलदीप जाधव यांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर भारतीय सैन्यदलातील नायब सुभेदार परवेझ शेख यांनी सैन्यदलातर्फे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. केंद्र शासनाकडून कुलदीप जाधव यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळवून देणार असल्याची घोषणा खासदार डॉ.भामरे यांनी केली. तर यापुढे जाधव कुटुंबियांना कायमस्वरूपी मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणार असल्याचे डॉ. तुषार शेवाळे यांनी जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com