
....त्यावेळी अवघी पंचक्रोशी शोकसागरात बुडाली होती...जवानाच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगा काढून लष्करी अधिकाऱ्यांनी तो वीरपत्नी धारित्री यांना सुपूर्द करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.
मनमाड (जि.नाशिक) : .. त्यावेळी अवघी पंचक्रोशी शोकसागरात बुडाली होती...जवानाच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगा काढून लष्करी अधिकाऱ्यांनी तो वीरपत्नी धारित्री यांना सुपूर्द करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.
पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ
‘सुरेश घुगे अमर रहे, अमर रहे !’च्या घोषणा आणि साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली. या वेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. जवान सुरेश घुगे हे २४ मराठा बटालियनमध्ये जम्मूच्या नौशेरा या सीमावर्ती नियंत्रण रेषेवर नियुक्तीस होते. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना ते उंच डोंगरावरून घसरून खाली पडले. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचार सुरू असतानाच त्यांना वीरमरण आले. २००६ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. सेवापूर्तीला अवघी काही वर्षे शिल्लक असताना त्यांना वीरमरण आल्याने अस्तगाव पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. जवान सुरेश घुगे यांची बातमी समजताच सारा गाव शोकसागरात बुडाला. गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. ग्रामस्थांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव जम्मूहून पुणे व तेथून अस्तगाव येथे आणण्यात आले.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
अस्तगावचे वीरपूत्र सुरेश घुगेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
जम्मूच्या राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना वीरमरण प्राप्त झालेले जवान सुरेश रघुनाथ घुगे यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. १४) दुपारी त्यांच्या मूळ गावी अस्तगाव (ता. नांदगाव) येथे लष्करी इतमामासह अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आल्याचे समजताच सारा गाव शोकसागरात बुडाला. गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. ग्रामस्थांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव जम्मूहून पुणे व तेथून अस्तगाव येथे आणण्यात आले. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंच्या जनसमुदायासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी, पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा नागरिकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
लष्करातर्फे मानवंदना
फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनामधून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी नेण्यासाठी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे, सुरेश घुगे अमर रहे’, अशा घोषणा देण्यात आल्या. सर्वांच्या हातात तिरंगी ध्वज होते. अंत्ययात्रा गावाजवळील शेतातील पटांगणात आल्यानंतर लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. सुभेदार संदीप कुंभार यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. लष्करातर्फे सुरेश यांचे आई-वडील, तसेच पत्नीचे सांत्वन करण्यात आले. आमदार सुहास कांदे यांच्यासह पोलिस अधिकारी, माजी सैनिक, लष्करी अधिकारी, महसूल व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पार्थिवाला लपेटलेला तिरंगा काढून लष्करी अधिकाऱ्यांनी तो वीरपत्नी धारित्री यांना सुपूर्द करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले. जवान सुरेश यांची कन्या आराध्या हिने पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्या वेळीही तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आमदार कांदे, खासदार डॉ. भारती पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, काँग्रेसचे अशोक व्यवहारे, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार उदय कुलकर्णी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी म्हणून मी घुगे कुटुंबीयांना शासनातर्फे एक कोटी रुपयांची मदत जाहीर करतो. तसेच शासनाकडून अन्य सवलतीही घुगे कुटुंबीयांना मिळून देण्यासाठी मदत करेल. -सुहास कांदे, आमदार, नांदगाव