PHOTO : सकाळी देवदर्शन अन् रात्रीच्या वेळेस 'असा' गोरखधंदा

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 7 January 2020

क्रूझर वा तवेरा चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात देवदर्शनाचा बहाणा करून ते येत. मध्यरात्रीच्या वेळी संशयित गावांमध्ये टेहेळणी करून बंद असलेली घरे वा दुकाने हेरून असा काही गोरखधंदा ते करायचे की त्याची माहिती पोलीसांना समजली.

नाशिक : क्रूझर वा तवेरा चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात देवदर्शनाचा बहाणा करून ते येत. मध्यरात्रीच्या वेळी संशयित गावांमध्ये टेहेळणी करून बंद असलेली घरे वा दुकाने हेरून असा काही गोरखधंदा ते करायचे की त्याची माहिती पोलीसांना समजली.

देवदर्शनाचा बहाणा 
संशयित भाभोर टोळी ही क्रूझर वा तवेरा चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात देवदर्शनाचा बहाणा करून येत. मध्यरात्रीच्या वेळी संशयित गावांमध्ये टेहेळणी करून बंद असलेली घरे वा दुकाने हेरून ती फोडून घरफोडी करीत आणि लाखोंचे ऐवज लंपास करून पुन्हा गुजरातमध्ये निघून जायचे. या टोळीचा म्होरक्‍या कांतीभाई भाभोर याच्याविरोधात गुजरातमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे 37 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात देवदर्शनासाठी यायचे आणि रात्रीच्या वेळी बंद दुकाने, घरांची टेहेळणी करून घरफोड्या करणाऱ्या परराज्यातील टोळीला जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुजरातमधील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील पाच घरफोड्या या बागलाण तालुक्‍यातीलच आहेत. संशयितांकडून सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Image may contain: 2 people, people standing

पोलीसांनी केली अशी कारवाई..

गुजरात सीमेलगतच्या बागलाण तालुक्‍यात घरफोड्यांचे गुन्हे वाढल्याने पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सीमावर्ती भागात लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास सुरू केला. यात तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित हे परराज्यातील असण्याची शक्‍यता पुढे आली. सहाय्यक निरीक्षक राजपूत, रवींद्र वानखेडे, दीपक आहिरे, अमोल घुगे, नीलेश कातकाडे, हेमंत गिलबिले, गिरीश बागूल यांच्या पथकाने गुजरात राज्यातील दुर्गम अशा दोहादा गाठले. दोहादाच्या खुजरिया या अतिदुर्गम भागात मुक्काम ठोकत संशयितांचा माग काढत टोळीचा म्होरक्‍या कांतीभाई व नानू मंडले या दोघांना अटक केली. चौकशीत तिसरा संशयित मांदो भाभोर यास अटक केली. तिघांना पोलिस खाक्‍या दाखविल्यानंतर आणखी दोघांच्या साथीने बागलाण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच, देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, तर वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे सात घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीत चोरलेले दहा तोळे सोने, 250 ग्रॅम चांदी असा तीन लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच टोळीने नाशिक जिल्ह्यासह धुळे, नगर, पुणे, सांगली या जिल्ह्यांतही घरफोड्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

हेही वाचा > लग्नाला नाही म्हणताच त्याने 'तिला' गालावर..गळ्यावर..पाठीवर...

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, जिल्ह्यातील सात गुन्ह्यांची उकल 

टोळीचा म्होरक्‍या कांतीभाई ऊर्फ तेरसिंगभाई भाभोर (वय 40, रा. खुजरिया, जि. दाहोद, गुजरात), नाना ऊर्फ नानू आगतराव मंडले (वय 27, रा. सहकारनगर, जि. दाहोद, गुजरात), मांदो ऊर्फ वकील तेरसिंग भाभोर (रा. खजुरिया सिमोडा, ता. गरबाडा, जि. दाहोद, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. तर, देवला जोरिया भाभोर, विनू तेरसिंग भाभोर (रा खुजरिया, जि. दाहोद, गुजरात) या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. 

हेही वाचा > PHOTOS : निरीक्षकांचा चाणाक्षपणा अन्‌ मोठे बिंगच फुटले! नव्या वर्षातील पहिलीच मोठी कारवाई...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang arrested by Nashik Police who did burglary Crime Marathi News