
दिव्यांग व्यक्तींना एसटीच्या तिकीट सवलतीसाठीचे दिलेले वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) ग्राह्य धरले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
वणी (जि. नाशिक) : दिव्यांग व्यक्तींना एसटीच्या तिकीट सवलतीसाठीचे दिलेले वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) ग्राह्य धरले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहकांकडून दिव्यांगांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार साधना अपंग संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी केली असून, याबाबत वाहकांना समज देण्याच्या मागणीचे निवेदन कळवण आगारप्रमुखांना देण्यात आले.
त्रास दिला जात असल्याची तक्रार
दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रांच्या जंजाळातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) तिकिटातील सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात आलेले असतानाही राज्यातील काही आगारांच्या वाहकांकडून दिव्यांग व्यक्तींची अडवणूक होत आहे; परंतु एसटी महामंडळाचे वाहक दिव्यांग बांधवांना एसटी आगाराचे सही-शिक्का असलेल्या ओळखपत्राची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अपंग सुरक्षा कायदा २०१६ अन्वये वैश्विक कार्ड सोबत असल्यावर सवलत देणे बंधनकारक केले आहे; परंतु वाहक आणि काही अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार दिव्यांग बांधव करीत आहेत.
याबाबत कळवण आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे, दशरथ महाले, दीपक भोये, दिगंबर पाटोळे, भरत मोरे, संतोष रोकडे आदी उपस्थित होते. यापुढे दिव्यांग बांधवांना अडचण आल्यास अपंग साधना संघातर्फे एसटी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.