प्रमुख गावांत फड रंगले! दुसऱ्या फळीतील नेत्यांचीही परीक्षा 

संतोष विंचू
Tuesday, 15 December 2020

कोरोनाने निवडणुका लांबल्याने यंदा प्रथमच अंदरसूल, नगरसूल, मुखेड, पाटोदा, राजापूर या मोठ्या गावांसह तापदायक असणाऱ्या गावांतही एकाच वेळेस निवडणूक असल्याने यंत्रणेवर ताण पडणार आहे.

येवला (जि.नाशिक) : तालुक्यातील गणाची गावे असलेल्या सर्व प्रमुख ग्रामपंचायतींसह तब्बल ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने बोचऱ्या थंडीतही गावाचे राजकारण पॅनलनिर्मितीसह उमेदवार निश्चित करताना तापू लागले आहे. यासाठी गुप्त बैठकांना ऊत आला असून, कुणाला टाळायचे आणि कुणाला गळाला लावायचे यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याने सध्या गावकीचे राजकारण रंग भरू लागले आहे. 

पंचवीस गावांत पुन्हा बे एके बे, उमेदवार निश्चितीसाठी गुप्त बैठकांना वेग 
यापूर्वी टप्प्याटप्प्याने निवडणुका होत असल्याने एकाच वेळी सर्वत्र वातावरण तापत नव्हते. कोरोनाने निवडणुका लांबल्याने यंदा प्रथमच अंदरसूल, नगरसूल, मुखेड, पाटोदा, राजापूर या मोठ्या गावांसह तापदायक असणाऱ्या गावांतही एकाच वेळेस निवडणूक असल्याने यंत्रणेवर ताण पडणार आहे. विशेष म्हणजे या सर्व गावांतील पुढाऱ्यांचे तालुक्याच्या राजकारणातही वलय आहे. त्यामुळे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी गावाची निवडणूक जिंकण्याचे आव्हान या नेत्यांपुढे उभे आहे. त्यादृष्टीने गावोगावी पॅनलनिर्मिती आणि उमेदवार शोधण्याची लगबग सुरू आहे. विशेषत: उमेदवारनिश्चितीच्या बैठकांनी गावोगावी वेग घेतला असून, डाव-प्रतिडाव, भाऊबंदकी व गटबाजीच्या राजकारणाने वेग धरला आहे. 

गावपुढारींची पॅनलची बांधणी
गावोगावचे पॅनलप्रमुख गावपुढारी सध्या पॅनलची बांधणी करीत आरक्षणानिहाय प्रभागातील उमेदवारांची निवड करण्यात मग्न आहेत. सरकारी सुटीचे दिवस वगळता येत्या २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने भरलेले उमेदवारी अर्ज गावासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे विजयाची क्षमता असणारे उमेदवार निवड करण्यात सध्या गावपुढारी दंग आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
येथे पुन्हा नवा डाव 
एप्रिल तेमेपर्यंत मुदत संपणाऱ्या देवळाणे, अंगुलगाव, तळवाडे-कौटखेडे, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव, वडगावबल्हे, बोकटे, आहेरवाडी-लहित-हाडपसवरगाव-जायदरे, खरवंडी-देवदरी, रहाडी, भारम, रेंडाळे-न्याहरखेडे खुर्द-न्याहरखेडे बुद्रुक, कोळगाव-वाईबोथी, अनकुटे-सावखेडे, डोंगरगाव-पिंपळखुटे खुर्द, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे, धामोडे, कुसमाडी या गावांची निवडणूक मार्चमध्ये जाहीर झाली होती. येथे उमेदवारी अर्जही दाखल झाल्याने पॅनलनिर्मितीसह उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले होते. किंबहुना कुसमाडी व कोळगाव येथे जागेइतकेच अर्ज आल्याने बिनविरोध निवडणूक निश्‍चित झाली होती. मात्र ही पूर्ण प्रक्रियाच आता रद्द झाल्याने येथे पुन्हा नवी समीकरणे दिसतील. यामुळे नेत्यांच्या नाकीनव येणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

येथे प्रचंड चुरस 
एप्रिलनंतर डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या नांदूर, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, अंगणगाव, धुळगाव, आडगाव रेपाळ, कानडी, सत्यगाव, नगरसूल, विसापूर, पिंपरी, साताळी, बाभूळगाव, जळगाव नेऊर, आंबेगाव, वाघाळे, मुखेड, पाटोदा, देशमाने, अंदरसूल, राजापूर, नेवरगाव, पुरणगाव, सातारे, पुरणगाव बुद्रुक, मुरमी, पिंपळगाव लेप, भाटगाव, सावरगाव, निमगाव मढ, उंदीरवाडी, महालखेडा, सोमठाणदेश, ठाणगाव, देवठाण, धामणगाव, कातरणी, विखरणी, सायगाव, खैरगव्हाण, गुजरखेडे या गावांची निवडणूक होणार आहे. या गावांतही प्रचंड चुरस दिसणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम 
-निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे ः १५ डिसेंबर 
-नामनिर्देशनपत्रे भरणे ः २३ ते ३० डिसेंबर 
-छाननी ः ३१ डिसेंबर 
-माघारीची अंतिम तारीख ः ४ जानेवारी 
-निवडणूक चिन्हवाटप ः ४ जानेवारी 
-मतदानाची तारीख ः १५ जानेवारी 
-मतमोजणी ः १८ जानेवारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election nashik marathi news