ब्रिटनमधील स्थिती निवळण्याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष; मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे 

grapes.jpg
grapes.jpg

नाशिक : कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटनने सहा आठवड्यांचा लॉकडाउन जाहीर केला. मात्र त्याच वेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडणे शक्य असल्याचे म्हटले आहे. नेमक्या याच लॉकडाउनमध्ये लंडनमध्ये देशातून ५०० टन द्राक्षे पोचताहेत. त्यामुळे ब्रिटनमधील स्थिती निवळण्याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष लागले आहे. अगोदरच मागील ऐन हंगामात लॉकडाउन लागू झाल्याने द्राक्ष निर्यातदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. 

देशातून ५०० टन द्राक्षे पोचणार;
भारतातून वर्षभरात अडीच लाख टन द्राक्षांची निर्यात होती. त्यातील एक लाख टन द्राक्षे युरोपमध्ये, उरलेली दीड लाख टन द्राक्षे अरब राष्ट्रे, रशिया, बांगलादेशामध्ये पाठविण्यात येतात. दक्षिण आफ्रिकेतून वर्षाला साडेचार लाख टन, तर चिलीतून चार महिन्यांत आठ लाख टन द्राक्षांची निर्यात होते. दक्षिण आफ्रिकेत यंदा सर्वसामान्य द्राक्षांचे उत्पादन आले असताना आता पाऊस सुरू झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम दक्षिण आफ्रिकेतील निर्यातक्षम द्राक्षांच्या उत्पादनावर होणार काय, याचा अभ्यास निर्यातदार करताहेत. तरीही दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षे जानेवारीच्या अखेरीस संपतात. चिलीच्या द्राक्षांसाठी अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले जाते. चिलीच्या द्राक्षांसाठी अमेरिका हा प्राधान्यक्रम असतो. भाव न मिळाल्यास मग मात्र युरोपच्या बाजारपेठेत चिलीची द्राक्षे पाठविली जातात. दरम्यान, देशातून भाजीपाल्याची निर्यात निम्म्यावर आली आहे. विमानसेवा बंद पडल्यानंतर दुपटीने वाढलेले भाडे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

युरोपमधील फळभाज्यांची निर्यात निम्म्यावर  
भेंडी, कारले, हिरवी मिरची, भोपळा, शेवगा याची निर्यात युरोपमध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे ५० रुपये किलोचा भाव आणि भाडे थेट शंभर रुपयांवर पोचले आहे. त्यामुळे भारतीयांना युरोपमध्ये दुप्पट भाव फळभाज्यांना द्यावा लागतो. वर्षाला सर्वसाधारणपणे अडीचशे कोटींची फळभाज्यांची निर्यात युरोपमध्ये होते. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 
द्राक्षांचे पॅकिंग सुरू होणार 
लंडनच्या सुपर मार्केटसाठी द्राक्षे पाठविण्यासाठी आणखी दहा दिवसांनी पॅकिंग सुरू होईल. भारतीय द्राक्षे १५ फेब्रुवारीपर्यंत लंडनमध्ये पोचतील. त्या वेळी स्ट्रेनच्या लॉकडाउनची स्थिती कशी राहणार, यावर द्राक्षांची सुपर मार्केटमधील मागणी आणि त्यासाठी मिळणारा भाव अवलंबून असेल. मुळातच, युरोपच्या बाजारपेठेत भारतीय द्राक्षे मार्च आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यासाठी १ फेब्रुवारीपासून पॅकिंगला सुरवात होते. नेमक्या या हंगामात चिलीची द्राक्षे युरोपमध्ये न दाखल झाल्यास भारतीय द्राक्षांसाठी चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना वाटते आहे. 

कोट 
कोरोना विषाणू संसर्गाच्या मागील लॉकडाउनमध्ये सुपर मार्केट सुरू राहिले होते. आताही ब्रिटनने जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा दिल्याने ‘इम्युनिटी बूस्टर’ द्राक्षांच्या खरेदीत अडचण येईल, अशी स्थिती दिसत नाही. मात्र रेस्टॉरंट, केटरिंग, हॉटेल बंद राहणार असल्याने शेतमालाच्या निर्यातीवर २५ टक्के परिणाम होण्याची चिन्हे दिसताहेत. तरीदेखील ब्रिटनमध्ये स्ट्रेन नियंत्रणात येईल, तसे ही चिन्हे धूसर होतील. 
-विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com