चिंताजनक! जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा @१७५ वर..दिवसभरात शहर-जिल्ह्यात वाढले १०९ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याने दगावलेल्या रुग्णांचा आकडा आणखी वाढल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता.22) आणखी दहा मृत्यु वाढल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा चिंताजनक आहे.सोमवारी दिवसभरात शहर-जिल्ह्यात 109 रुग्ण वाढले आहेत.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याने दगावलेल्या रुग्णांचा आकडा आणखी वाढल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता.22) आणखी दहा मृत्यु वाढल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा 175 झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा, मालेगावातील एक आणि तालुक्‍यातील वडगावातील एक तर चांदवडमध्ये एक आणि निफाड तालुक्‍यातील ओझरमधील एक असे दहा रुग्णांचा मृत्यु झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात शहर-जिल्ह्यात 109 रुग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यात दहा रुग्ण दगावले 

जिल्ह्यात कोरोनाची लागण होऊन मृतांचा आकड सातत्याने वाढतो आहे. सोमवारी (ता. 22) नाशिक शहरात सहा रुग्णांचा मृत्यु झाला. यात वडाळा रोडवरील 62 वर्षीय पुरुष, जुन्या नाशिकमधील 69 वर्षीय महिला, कोकणीपुऱ्यातील 87 वर्षीय पुरुष, कालिदार कला मंदिर परिसरातील 59 वर्षीय पुरुष, मनोहर गार्डन परिसरातील 40 वर्षीय महिला तर उपनगरच्या हरिवंदन सोसायटीतील 66 वर्षीय महिलेचा महापालिकेच्या कोविड रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यामुळे शहरातील मृतांचा आकडा 68 झाला आहे. तर, मालेगावातील 52 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याने मालेगाव शहरातील मृतांचा आकडा 71 झाला. त्याचप्रमाणे, चांदवड शहरातील आयटीआय रोड परिसरातील 59 वर्षीय पुरुष, मालेगाव तालुक्‍यातील वडगावचे 59 वर्षीय पुरुष आणि निफाड तालुक्‍यातील ओझर येथील 24 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला. यामुळे उर्वरित जिल्ह्यातील मृतांचा आकडा 26 झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 175 झाला आहे.

दिवसभरात कोरोनाबाधित 109 रुग्ण
जिल्ह्यातील वाढलेल्या 109 बाधित रुग्णांमध्ये नाशिक शहरात 85, मालेगावात तीन तर उर्वरित जिल्ह्यात 24 रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी रात्री नाशिक शहरातील 45 रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बागवानपुरा, सोनार गल्ली, पेठरोड, पंचशिलनगर, जुने नाशिकमधील कुंभारवाडा, नाईकवाडी पुरा, जुना दर्गा, नानावली, कथडा, तर टाकळीरोड, खडकाळी, सातपूरचे शिवाजीनगर, जुन्या नाशिकमधील चव्हाटा, सप्तशृंगीनगर, उपनगरच्या विजय-ममता परिसर, पंचवटीतील हनुमानवाडी, सिडकोतील कामटवाडा, नाशिकरोडला गोसावीवाडी, पंचवटीतील फुलेनगर, अंबड-लिंकरोडवरील जाधव संकुल, पंचवटीतील नवनाथनगर, द्वारकेचे संत कबीरनगर या परिसरात तब्बल 45 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर, अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातील दोन रुग्णही नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2,864 झाला आहे.

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

तत्पूर्वी, देवळालीतील 18 वर्षांचा युवक बाधित झाला. राजीवनगर परिसरात अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह 32 वर्षीय महिला, सिडकोतील खुटवडनगरमध्ये पुरुष, कोकणीपुऱ्यात 57 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, काठेलेनमध्ये 53 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक, सातपूरच्या जाधव संकुलात 30 वर्षीय युवक, वडाळा रोडला 45 वर्षीय पुरुष, पंचवटीतील मजूरवाडीत तीन पुरुष, कामगारनगरमध्ये 55 वर्षीय पुरुष, पंचवटीतील क्रांतीनगरमध्ये 47 वर्षीय पुरुष, तारवालानगरमध्ये 42 वर्षीय पुरुष, बागवान पुऱ्यात 25 वर्षीय महिला, 22 वर्षीय युवक, 52 वर्षांची महिला, पखालरोडला 26 वर्षांचा युवक, कोकणीपुऱ्यात 39 वर्षीय पुरुष, हिरावाडीत 27 वर्षीय युवक, 58 वर्षीय पुरुष, सिडकोत राजीवनगरला 60 वर्षीय पुरुष, मेरी लिंक रोडला 23 वर्षीय युवक, गणराज चौकात 30 वर्षीय महिला, अंबडच्या डीजीपीनगरला 57 वर्षीय पुरुष, कामटवाड्यात 51 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला, भाभानगरमध्ये 14 वर्षीय मुलगा कोरोनाबाधित झाला आहे.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

मालेगावातील पिंपळे येथे एक महिला व युवकासह शहरातील महिलेला कोरोनाची लागण झाली. तर दिंडोरी तालुक्‍यातील तिघे, सिन्नर शहरात 13 व 15 वर्षांच्या मुलींसह चार महिला, दोन पुरुष तर, दोडीतील पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. इगतपुरीतील 60 वर्षीय महिला, पिंपळगाव बसवंत येथील 56 वर्षीय महिला व निफाडमधील 56 वर्षीय महिला व पिंपळस येथील 57 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. शिरवाडे वणी एक, तर बागलाणमधील 78 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: growing death of Corona in the district is worrisome nashik marathi news