आशादायक! प्रतिकूल परिस्थिती अन् कमी मनुष्यबळामध्येही 'इथे' रुग्णांना तत्पर सेवा; कुठे ते वाचा

सागर आहेर
Wednesday, 16 September 2020

या केंद्रात रुग्णसेवा तत्परतेने दिली जात असल्याने उपचार करून घेणाऱ्या रुणांची संख्याही वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरविली जाणारी औषधे बऱ्याचदा कमी पडत असल्याने रुग्णकल्याण निधीतून औषधे खरेदी केली जातात.

नाशिक : (चांदोरी) कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरांवर आरोग्ययंत्रणा काम करत आहे. याच परिस्थितीत नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या चांदोरी येथील आंतररुग्णाबरोबर तालुक्यात सर्वाधिक जास्त बाह्यरुग्णांना सेवा देत असलेल्या चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रतिकूल परिस्थितीत आणि कमी मनुष्यबळामध्ये रुग्णांना तत्पर सेवा देत आहे. 

रुग्णकल्याण निधीतून औषध खरेदी 

चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५ गावे व सहा उपकेंद्रे असून, सद्यःस्थितीत एक वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसेवक व तीन शिपाई अशी पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या काळात इतर खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर व सेवक कोरोनाबाधित होत असतानादेखील येथील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी काळजी घेऊन प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा देत आहेत. 


 
कमी जागेत काम 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पडकी झाल्याने चार वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यायी जागेत स्थलांतरित न करता बाजूलाच असलेल्या छोट्या जागेत चालविले जात आहे. यामध्ये कुटुंबकल्याण वॉर्डात प्रसूती करणे, रक्त-लघवी प्रयोगशाळा यासह कार्यालयीन कामकाज केले जात आहे. तसेच बाजूला असणाऱ्या छोट्या वॉर्डात केसपेपरसह रुग्ण तपासणे, औषधोपचार केला जातो. या केंद्रात रुग्णसेवा तत्परतेने दिली जात असल्याने उपचार करून घेणाऱ्या रुणांची संख्याही वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरविली जाणारी औषधे बऱ्याचदा कमी पडत असल्याने रुग्णकल्याण निधीतून औषधे खरेदी केली जातात.

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तत्काळ आरोग्यसेवेला प्राधान्य दिले जात असून, नागरिकांनी स्वच्छता, सुरक्षितता यास प्राधान्य द्यावे. - डॉ. मुकुंद सवई, वैद्यकीय अधिकारी, चांदोरी 

चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले जात असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यास प्राधान्य दिले जाईल. - सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य, चांदोरी

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthcare from them even in adverse conditions nashik marathi news