पूरपाण्यामुळे पाणीपुरवठा योजनाचं चांगभलं! कसमादेसाठी पाण्याचा प्रश्न सुटला

गोकुळ खैरनार 
Tuesday, 22 September 2020

यंदा जूनपासूनच मालेगाव, नांदगाव व बागलाण तालुक्यांत दमदार पाऊस झाला. मध्यंतरीच्या काळात देवळा, कळवण व चांदवडवर पाऊस काहीसा रुसला होता. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. कसमादे पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे या भागातील चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद, नाग्यासाक्या ही धरणे झपाट्याने भरण्यास मदत झाली. 

नाशिक/मालेगाव : सलग दुसऱ्या वर्षी कसमादेत धुव्वाधार पाऊस झाल्याने पावसामुळे खरिपाचे उत्पन्न वाढणार आहे. शिवाय रब्बीच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ होणार आहे. पावसामुळे तलाव, पाझर तलाव, विहिरी, नद्या, नाले तुडुंब भरले आहेत. याशिवाय गिरणा-मोसमच्या पूरपाण्यामुळे मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत. अजून परतीचा पाऊस बाकी आहे. उपलब्ध जलसाठा व पूरपाण्याचा स्त्रोत पहाता हे पाणी डिसेंबरअखेर सहज पुरणार आहे. त्यामुळे कसमादेतील विविध धरणांतून पिण्यासाठीच्या पहिल्या आवर्तनाची गरज नव्या वर्षातच भासू शकेल. 

पावसाची जोरदार हजेरी

यंदा जूनपासूनच मालेगाव, नांदगाव व बागलाण तालुक्यांत दमदार पाऊस झाला. मध्यंतरीच्या काळात देवळा, कळवण व चांदवडवर पाऊस काहीसा रुसला होता. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. कसमादे पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे या भागातील चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद, नाग्यासाक्या ही धरणे झपाट्याने भरण्यास मदत झाली. धरणातून विसर्ग होत गेल्याने गिरणा दोन महिन्यांपासून वाहत आहे. मोसम नदीलादेखील महिन्यापासून कमी प्रमाणात का होईना पाणी आहे. चणकापूर व पुनंद धरणांवर मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गिरणेच्या पूरपाण्याचा फायदा या पाणीपुरवठा योजनांना होत आहे. गिरणा डावा व उजवा हे दोन्ही कालवे वाहत आहेत. मालेगाव शहराला तळवाडे साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे तलावात पूरपाणी पोचते. महिन्यापासून तलाव ओव्हरफ्लो आहेत. तलावात सध्या ८७ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही तुडुंब भरला आहे. पूरपाण्याखेरीज या भागात होत असलेल्या सातत्याच्या पावसामुळे देखील जलसाठा वाढत आहे. 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

आणखी तीन महिने लाभ 

सद्यःस्थितीत पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरले आहेत. अजून किमान महिनाभर तरी गिरणा नदीला पूरपाणी राहील. नदीचा पूर ओसरताना सर्व पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरून घेतले जातील. हे जलसाठे अडीच ते तीन महिने सहज पुरतील. त्यामुळे चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या धरणांमधून पहिले आवर्तन सोडण्याची गरज नवीन वर्षातच पडू शकेल. शिवाय रब्बीसाठीही यंदा धरणांमधून पुरेसे पाणी मिळू शकेल.

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains have solved the water crisis nashik marathi news