शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; पावणेदोन लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका

one lakh 64 thousand hectare area affected due heavy rains maharashtra nashik marathi news
one lakh 64 thousand hectare area affected due heavy rains maharashtra nashik marathi news

नाशिक : राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि पुरामुळे एक लाख ६४ हजार ५१८ हेक्टरला फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंबंधी सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. सद्यःस्थितीत पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असून, नुकसान क्षेत्र आणि पिकांचा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल आणि केंद्र सरकारला कळवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश - दादा भुसे

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील गेल्या आठवड्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीत भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, डाळिंब, भाजीपाला, बाजरी, हळद, ऊस, मका, केळी या पिकांचा समावेश आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील नाशिकमध्ये आले असताना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना कधी होणार आहे? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सर्वेक्षणाची माहिती आल्यावर त्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्यात उसाचे क्षेत्र वगळता एक कोटी ४१ लाख ९८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत गेल्या आठवड्यापर्यंत एक कोटी ४३ लाख ६४ हजार म्हणजेच, १०१. १७ टक्के हेक्टरवर यंदा खरिपाची पिके घेण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या खरिपात ९७.२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सध्याच्या खरिपाच्या पिकांपैकी भात फुटवे फुटणे, फुलोरा आणि काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. नागली वाढ ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी पोटरी ते फुलोऱ्याच्या, तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू आहे. मूग आणि उडीद शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत असून, काढणीला सुरवात झाली आहे. सोयाबीन व भुईमूग फुलोरा ते शेंगा लागणे आणि पक्वतेच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी काढणीस सुरवात झाली आहे. कापूस पाते धरणे, फुलोरा आणि बोंडे लागण्याच्या आणि ज्वारी पोटरी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी ज्वारीमध्ये दाणे भरण्यात येत आहेत. सूर्यफूल फुलोरा ते दाणे भरण्याच्या, मका फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी मक्याची काढणी सुरू झाली आहे. तूर काही ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. 

 सव्वादोन लाख हेक्टरला कीडरोगाचा दणका 

राज्यातील सव्वादोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्राला कीडरोगाचा फटका बसला आहे. त्यात मुगाचे ५० हजार ४०३, उडिदाचे १६ हजार ३३८, सोयाबीनचे एक लाख ६२ हजार १६९, संत्रा-मोसंबीच्या सात हजार ६४१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दरम्यान, कृषिपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने नोव्हेंबर २०१९ मध्ये सहा लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. मदतीसाठी ६३६ कोटी २३ लाखांचा निधी अपेक्षित होता. त्यापैकी जवळपास ५८७ कोटींच्या मदतीचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. उरलेला निधी विभागीय आयुक्तालय स्तरावर प्राप्त झाला असून, तांत्रिक अडचणी दूर होताच, ही मदत वाटप केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 


नाशिक जिल्ह्यातील शेतीचे नुकसान आणि अपेक्षित निधी 

- मे २०२० : २० गावांमधील ९७३ शेतकरी-६६४.२९ हेक्टर क्षेत्र- दहा कोटी एक लाख ६५ हजार रुपये 
- जुलै-ऑगस्ट २०२० : ८४६ गावांतील ३८ हजार ६२२ शेतकरी- १२ हजार ८६६ हेक्टर- ११ कोटी तीन लाख 
- सप्टेंबरमधील प्राथमिक अंदाज : ३७ हजार ८३० हेक्टर (पंचनामे अंतिम टप्प्यात)  


संपादन - रोहित कणसे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com