dhondbar
dhondbar

काय सांगता.. 'इथे' बळीराजालाही मिळते रविवारची सुटी.. देशातील एकमेव गाव असल्याचा दावा

नाशिक/ सोनांबे : रविवार म्हटले की सुट्टीचा वार. देशातच नव्हे तर संपूर्ण जगातील अनेक देशात रविवार हा सुटी असते. यादिवशी अनेक जण आराम करतात. प्रत्येकाला हा रविवार हवा हवासा असतो. या दिवशी सर्वजण सुट्टीचा पुरेपुर आनंद घेत पर्यटन किंवा मौजमजा करतात. या दिवशी शाळा-महाविद्यालयांसह सरकारी, निमसरकारी, औद्योगिक आणि खासगी क्षेत्रातील काम करणारा संघटित व असंघटित कामगारदेखील सुटीचा आनंद घेत असतात. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मात्र कधी सुटी नसते;
 

राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव गाव असल्याचा दावा

सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले धोंडबार पूर्णपणे आदिवासी गाव आहे. श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने का होईना या ठिकाणी सर्व जण रविवारी सुटी घेतात. या दिवशी येथील रविवार हा कामबंद वार म्हणून पाळला जातो. रविवारी गावातील कोणीही शेतावर कामाला जात नाही. त्याचबरोबर पूर्वी बैल, तर आता बैल किंवा कोणत्याही यंत्रानेसुद्धा शेतात रविवारी काम करण्यास सुटी असते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यातील धोंडबार गाव हे एकमेव असे गाव आहे की या ठिकाणी संपूर्ण गाव बळीराजासह सुटी घेते. राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव गाव असल्याचा दावा देखील येथील ग्रामस्थ करतात.

अशी आहे दंतकथा

रविवारी सिन्नरला आठवडेबाजार भरत असल्याने गावातील बहुतेक लोक तालुक्‍याला जाऊन बाजार करतात. आबालवृद्ध गावाच्या पारावर येऊन गावातील एकमेकांचे सुख-दुःख आणि इतर मनमोकळ्या गप्पा मारतात.
रविवारी संपूर्ण गाव सुटी का घेते यामागे देखील दंतकथा असल्याचे येथील लोक सांगतात. गावात पूर्वी कानडी आणि हिंदू महादेव कोळी समाजाचे लोक राहत. गावाच्या परिसरात कानडी समाजाच्या लोकांना एक शेंदूर असलेला दगड (भैरवनाथ) रविवारी सापडला; परंतु त्याची सेवा करण्याचा अधिकार कोणाचा म्हणून कानडी आणि महादेव कोळी समाज यांच्यात वाद झाला. तेव्हा कौल लावून निर्णय होणार परंतु एका समाजाला ते मान्य नव्हते. म्हणून एक रेषा मारून शेंदूर लावलेला दगड ज्या बाजूच्या समाजाकडे सरकेल त्या वेळी समाजाला देवाच्या पूजेचा मान मिळेल. शेंदूर असलेला दगड महादेव कोळी समाजाच्या बाजूला रविवारी सरकला म्हणून रविवार भैरवनाथाचा वार म्हणून शेतीकाम बंद ठेवले जाते.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

रविवारी परंपरेने मोढा (कामबंद) पाळला जातो. जर या दिवशी काम केले तर काही ना काही वाईट घटना घडते (सर्पदंश, विंचुदंश) असे ज्येष्ठ गावकरी सांगतात. काहीही असो रविवारी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना सुटी मिळते. ही एक चांगली परंपरा आमच्या गावाची आहे.
चंद्रभान साबळे, सरपंच, धोंडबार

हेही वाचा >  "आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा.." सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती 

संपूर्ण भारतात नसणारी अशी एक परंपरा जी आमचे गाव अनेक वर्षांपासून पाळत आहे. शेतकऱ्यांनासुद्धा आठवड्यातून एक दिवस आराम मिळावा अशी श्रद्धेतून म्हणा किंवा अंधश्रद्धेतून चालत आलेली एकमेव परंपरा धोंडबार गावाला आहे.-चंद्रभान खेताडे, पोलिसपाटील, धोंडबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com