लेकीच्या पोटी लेक जन्मली, तीच खरी आमची भाग्यविधाता! 

मुलीचे वाजतगाजत स्वागत.jpg
मुलीचे वाजतगाजत स्वागत.jpg

नाशिक : (इंदिरानगर) घरात मुलाचा जन्म झाल्यावर कुटुंबाचा "कुलदीपक' झाला म्हणून जल्लोषात स्वागत केल्या गेल्याच्या घटना आपण समाजात नेहमीच पाहतो. समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाल्यावर मुलींना स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर मुलींचे स्वागतही वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागले आहे. 

लक्ष्मी अवतरली आणि प्रगती झाली

चेतनानगर येथील व्यावसायिक कासीम मुजावर यांनी याबाबत आदर्श घालून दिला. त्यांच्या दोन दिवसांच्या नातीने शनिवारी (ता. 8) सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात, तुतारींच्या निनादात सजवलेल्या चारचाकीतून मिरवणूक काढून गृहप्रवेश केला. हा आगळावेगळा जल्लोष "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. कासीम आणि अरिफा मुजावर यांना मुलगी नसरीनच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने स्थिरता प्राप्त झाली. तेव्हापासून घरी लक्ष्मी अवतरली आणि प्रगती झाली, 
अशी त्यांची मान्यता आहे. नसरीनचा अंधेरी येथील व्यावसायिक फहाद सय्यद यांच्याशी विवाह झाला. सय्यद कुटुंबातही दोन पिढ्यांपासून मुलगी जन्माला आली नव्हती. त्यामुळे मुजावर कुटुंबीयांप्रमाणेच त्यांना घरात मुलगी जन्माला यावी, अशी अपेक्षा होती. गुरुवारी (ता. 6) नसरीनने डॉ. गणोरकर यांच्या रुग्णालयात या चिमुकलीला जन्म दिला अन्‌ सर्वांची अपेक्षा पूर्ण झाली. 

पुन्हा एकदा लक्ष्मी आमच्या कुटुंबात आल्याने हा आनंदोत्सव

मुजावर कुटुंबीय मुलीला सुरवातीपासूनच लक्ष्मी मानते. त्यात सय्यद कुटुंबाचाही आनंद एक झाला. रुग्णालयातून घरी आणताना शनिवारी चेतनानगर येथील राम मंदिरापासून छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी चिमुकलीचे आजोबा गुलाम जिलानी सय्यद, आजी मुमताज, काका-फहीद, काकू सुबिया तसेच कासीमभाई यांचे भाऊ अब्बास, वहिनी आसमा, इसाक आणि सौ. रोशन यांच्यासह मुलगा आजीम मुलगी आफरीन, पुतणे अतिक, आकीब असे सर्व नातेवाईक उपस्थित होते. संपूर्ण बंगल्याला रोषणाई करण्यात आली होती. या चिमुकलीच्या येण्याने पुन्हा एकदा लक्ष्मी आमच्या कुटुंबात आल्याने हा आनंदोत्सव साजरा करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

तिला मी "लक्ष्मी' मानतो

मुलीच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने प्रगती झाली. तिला मी "लक्ष्मी' मानतो. तिच्यापोटी पुन्हा लक्ष्मीने जन्म घेतल्याचा मोठा आनंद झाला आहे. आज समाजात मुलगी हीच खऱ्या अर्थाने भाग्यविधाता आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळेच तिचे जल्लोषात स्वागत केले. - कासीम मुजावर, आजोबा 

अल्लाहचे आभार मानण्यासाठी हा जल्लोष

अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आल्यानंतर नकोशी होते. पण मुलगीच व्हावी, अशी मी अल्लाहकडे प्रार्थना करत होतो. ती पूर्ण झाली. त्यामुळे अल्लाहचे आभार मानण्यासाठी हा जल्लोष केला. अनेक वर्षांनंतर कुटुंबात मुलगी आल्याने खूप आनंदी आहे. - फहाद सय्यद, वडील  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com