चमत्कारच! जन्मत: ऐकू न शकणाऱ्या संकेतच्या कानी सहाव्या वर्षी घुमले शब्दसूर! आयुष्यात फुलले शब्दांचे नंदनवन

मोठाभाऊ पगार 
Saturday, 19 September 2020

श्रवण करता आले तरच बोलणे शक्य होते. पण जन्मजात ऐकू न शकणाऱ्या संकेतला आवाजाचे कोणतेच संकेत मिळत नव्हते.पण  कुटुंबाच्या या संघर्षाला आता फळ मिळू लागले आहे. संकेतच्या कानी शब्दसूर घुमू लागल्याने आता सहाव्या वर्षी तो सामान्य मुलाप्रमाणे बोलू लागलाय... कसे शक्य झाले ते वाचा..

नाशिक / देवळा : श्रवण करता आले तरच बोलणे शक्य होते. पण जन्मजात ऐकू न शकणाऱ्या संकेतला आवाजाचे कोणतेच संकेत मिळत नव्हते.पण  कुटुंबाच्या या संघर्षाला आता फळ मिळू लागले आहे. संकेतच्या कानी शब्दसूर घुमू लागल्याने आता सहाव्या वर्षी तो सामान्य मुलाप्रमाणे बोलू लागलाय... कसे शक्य झाले ते वाचा..

शाळेचे वेध तर लागले पण... 
ही कहाणी आहे वडगाव (ता. मालेगाव) येथील संकेत आहिरे या बालकाची. वडील ज्ञानेश्वर आहिरे नाशिक येथे विशेष सुरक्षा विभागात पोलिस, तर आई सोनाली ही गृहिणी. संकेत वर्षाचा झाला तरी आवाजास प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर आई-वडील चिंतेत पडले. हळूहळू होईल ठीक या आशेत चार वर्षे निघून गेली; परंतु संकेत ऐकूही शकत नव्हता आणि शब्दही उच्चारत नव्हता. यामुळे त्याचा भाषिक विकास थांबला होता. शाळेचे वेध तर लागले होते पण ते शक्य होत नव्हते. 

प्रयत्नांची पराकाष्ठा 
छोट्या-मोठ्या वैद्यकीय तपासण्या करून झाल्यानंतर हे सिद्ध झाले की संकेत काहीच ऐकू शकत नाही आणि यावर एकच पर्याय सांगितला गेला, तो म्हणजे, कॉकलिअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया. याचा खर्च होता एका कानासाठी आठ लाख आणि दोन्ही कानांसाठी १६ लाख रुपये, पण या शस्त्रक्रियेचा खर्च आहिरे कुटुंबाला न झेपणारा होता, ना एवढा मोठा पैसा उभा करणे शक्य होते. वडील शासकीय कर्मचारी असल्यामुळे शासकीय मदत मिळत नव्हती. संकेतच्या वडिलांनी पोलिस कुटुंबकल्याण आरोग्य योजनेत विशेष बाब म्हणून संकेतच्या शस्त्रक्रियेसाठी प्रकरण दाखल केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर प्रयत्नांना यश आले. 

शब्दांची हळूहळू ओळख 
पोलिस महासंचालकांनी विशेष बाब म्हणून या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मंजूर करून दिली आणि संकेतच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला म्हणजे वर्षभरापूर्वी जन्मजात ऐकू न शकणाऱ्या संकेतवर मुंबई येथील एस.आर.सी.सी. रुग्णालयात कानाचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने व डॉ. श्रुती बन्सल यांनी तब्बल सात तास दोन्ही कानांची कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केली. डोक्याच्या आत कानाजवळ सूक्ष्म यंत्रे बसविली असून, बाहेरून कानात घालण्यासाठी मशिन दिले आहे. स्पीच थेरपीद्वारे एकेक शब्दाची हळूहळू ओळख करून देत अवघ्या वर्षभरात संकेतच्या आयुष्यात शब्दांचे नंदनवन फुलले आहे. 

कुटुंबीय उत्सुक 
संकेत आता प्रत्येक ध्वनी ऐकू शकतो. गेल्या चार-साडेचार वर्षांत एकही शब्द ऐकू न शकलेल्या संकेतला आता ध्वनीसह शब्दांची ओळख होत आहे. यासाठी खास क्लास लावला असून, आईची मदत घेत तो आता सामान्य मुलांप्रमाणे बोलू लागला आहे. त्याचे बोल ऐकण्यासाठी कुटुंबीय उत्सुक असतात. 

(संपादन : भीमराव चव्हाण) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hopefully sanket can hear now nashik marathi news