पर्यटनस्थळे बंदमुळे हॉटेल-रिसॉर्टची कोंडीच; अद्यापही पर्यटकांची प्रतीक्षा!

गौरव परदेशी 
Tuesday, 6 October 2020

पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळे सुरू झाल्यानंतरच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ग्राहक वाढतील. त्यामुळे सरकार पर्यटन आणि तीर्थस्थळांबाबत कधी निर्णय घेणार, याकडे पर्यटनस्थळांवरील हॉटेलचालकांचे लक्ष लागले आहे.

खेडभैरव (जि.नाशिक) : लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असणारी हॉटेल आणि रिसॉर्ट सोमवारी (ता. ५) पन्नास टक्के क्षमतेने सुरू झाली. पण पर्यटननगरीत पर्यटनस्थळ बंद असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भंडारदरा पंचक्रोशीतील हॉटेल, रिसॉर्टला अद्यापही पर्यटकांची प्रतीक्षा आहे. 

पर्यटनस्थळे बंदमुळे हॉटेल-रिसॉर्टची कोंडीच 
शासनाने पर्यटन, तीर्थक्षेत्राबाबत निर्णय घेतलेला नाही. इगतपुरी- त्र्यंबकेश्वरमधील पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळे सुरू झाल्यानंतरच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ग्राहक वाढतील. त्यामुळे सरकार पर्यटन आणि तीर्थस्थळांबाबत कधी निर्णय घेणार, याकडे पर्यटनस्थळांवरील हॉटेलचालकांचे लक्ष लागले आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तसेच येथून जवळच असलेल्या भंडारदरा, कळसूबाई हा परिसर पर्यटननगरी म्हणून ओळखला जातो. निसर्गरम्य डोंगरदऱ्या, असंख्य पांढरेशुभ्र धब-धबे, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन तीर्थस्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

पूर्ण क्षमतेने सुरू करा

कोरोना महामारीमुळे पर्यटनावर आधारित हॉटेल, रिसॉर्टवर आधारित व्यवसाय सहा महिन्यांपासून ठप्प आहे. सोमवारपासून हॉटेल आणि रिसॉर्ट ५० टक्के क्षमतेने सुरू झाली असली तरी, येथील प्रसिद्ध देवस्थाने, पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे, गड-किल्ले पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ग्राहक येणार नसल्याचे व्यावसायिक सांगतात. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

हॉटेल सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी जोपर्यंत पर्यटनस्थळे, देवस्थाने सुरू होत नाहीत, तोपर्यंत हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येणार नाहीत. काहीही असले तरी यापुढे हॉटेलमालक, पर्यटक, नागरिकांना स्वतः काळजी घ्यावी लागणार आहे. - सुमीत बोधक, हॉटेल जलसा, घोटी 

हॉटेलमध्ये येणाऱ्या स्थानिक ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. पर्यटनस्थळे, देवस्थाने, गड-किल्ले सुरू झाले, तरच बाहेरून पर्यटक येतील, तेव्हाच हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू होईल; अन्यथा तोपर्यंत हॉटेल व्यवसाय ठप्पच असणार आहे. - सुमीत कृपलानी, हॉटेल मानस लाइफ स्टाइल, इगतपुरी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel-resort closure due to tourist spots nashik marathi news