नांदगाव रेल्वेस्थानकाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न; संघटित होऊन लढा देण्याची गरज 

संजीव निकम 
Friday, 4 December 2020

कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मिळकती  व पायाभूत विकासासाठीच्या  सर्व संधी उपलब्ध असूनही ‘आले अधिकाऱ्यांच्या मना तेथे कुणाचे चालेना ’ अशी अवस्था नांदगावकरांवर ओढविली आहे . त्यामुळे आता नांदगावचे रेल्वेस्थानकाचे कमी होत असलेले महत्त्व वाचविण्यासाठी संघटित होण्याची वेळ आली आहे. 

नांदगाव (जि.नाशिक) : सार्वजनिक खासगी भागीदारीच्या  माध्यमातून रेल्वे स्थानकांचा विकास करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांच्या अगदी विरोधात जाऊन एखाद्या स्थानकाला  दुर्लक्षित करताना भुसावळ मंडळातील अधिकाऱ्यांनी  आपल्या व्हिजन डॉक्युमेंटच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याने लोहमार्गावरील  नांदगाव स्थानकाचे महत्त्व आता कमी होऊ लागले आहे.

नांदगाव रेल्वेस्थानकाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न 

विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मिळकती  व पायाभूत विकासासाठीच्या  सर्व संधी उपलब्ध असूनही ‘आले अधिकाऱ्यांच्या मना तेथे कुणाचे चालेना ’ अशी अवस्था नांदगावकरांवर ओढविली आहे . त्यामुळे आता नांदगावचे रेल्वेस्थानकाचे कमी होत असलेले महत्त्व वाचविण्यासाठी संघटित होण्याची वेळ आली आहे. मुंबई  ते  ठाणे अशी पहिली रेल्वे धावल्यानंतर दुसरा टप्पा ठाणे ते न्यायडोंगरी असा होता. या विकासपर्वासाठी तेव्हाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी  जाणीवपूर्वक निवड केली. वाफेवरच्या  इंजिनासाठी लागणाऱ्या  पाण्याची मुबलकता व कोळसा यासाठी नांदगाव स्थानक मध्यवर्ती होते.  शेकडो एकरात  पसरलेली वसाहत, लोकोशेड, विस्तीर्ण मालवाहू गाड्यांचे यार्ड अशा विविध प्रकल्पांची रेलचेल नांदगावला होती. कर्मचाऱ्यांची संख्याही काही हजारात असायची. 

नागरिकांना आता संघटित होऊन लढा देण्याची गरज 
मात्र जसा काळ बदलला तसा आता नांदगाव स्थानकाबद्दल  कोरोनाचे निमित्त करून वर्षानुवर्षे थांबणाऱ्या  प्रवासी गाड्यांचे  थांबे काढून घेतले जात आहेत. आरक्षणासाठी प्रतिसाद नसल्याच्या  सबबी खाली नांदगाव स्थानकातले महत्त्व कमी करण्याच्या या सूचक हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच पाणी नसल्याच्या  मुद्द्यावरून तीस वर्षांपूर्वी नांदगावचे लोकोशेड स्थलांतरित झाले. त्यापाठोपाठ सी  ॲन्ड डब्ल्यू हा  प्रकल्प हलविण्यात आला. मालवाहू  वाहतुकीसाठीचे मध्यवर्ती यार्ड  आता गाड्यांअभावी सुनेसुने झाले आहे. हळूहळू प्रकल्प  स्थलांतरित होण्याचा परिणाम नांदगावच्या बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक चलन वळण  थांबले. हे सर्व सुरू असताना आता थांबे बंद होत असल्याने नांदगावच्या स्थानकाला दुय्य्म ठरण्याचा  धोका उभा राहिला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

जर नांदगाव स्थानकाबरोबर असे घडले तर एखाद्या ग्रामीण स्थानकांची जी अवस्था असते, तशीच वेळ नांदगाववर येण्याची दाट शक्यता आहे. कधीकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी रेल रोको आंदोलन केले होते. त्याला तीस वर्षे उलटली  तेव्हापासून आजतागायत नांदगावबाबतचा ठेवण्यात आलेला आकस तसूभरही कमी होत नाही. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

संघटित होण्याची खरी गरज

नांदगाव स्थानकाच्या प्रश्नावरुन व्यापक जनरेटा उभारू. आता जनतेने जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर संघटित होण्याची खरी गरज आहे. - सुमित सोनवणे, नांदगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: importance of Nandgaon railway station nashik marathi news