warkari.jpg
warkari.jpg

वारकऱ्यांच्या पालखीत सरकारी बाबूंची घुसखोरी!

नाशिक : पंढरपूरला जाणाऱ्या आषाढीवारीला मानाच्या पालख्यांतील 20 वारकऱ्यांना शासनाने परवानगी दिली, तरी त्यात पोलिस आणि वैद्यकीय अधिकारी घुसवले असून, प्रशासकीय घुसखोरीविषयी वारकऱ्यांत नाराजी आहे. सरकारी बाबूंची वारी घडविण्यासाठी वारकऱ्यांची संख्या घटविण्याला वारकऱ्यांचा विरोध आहे.

वयाची अट शिथिल करण्याची मागणी

65 वर्षांवरील ज्येष्ठांना परवानगी न देण्याबाबत यंत्रणा हटून बसल्याने वारकऱ्यांनी जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर "वाखरी ते पंढरपूर' पायी वारीचा आग्रह चालविला आहे. त्यामुळे हा विषय आगामी काळात पेटण्याची चिन्हे आहेत. सरकारी बाबूंची वारी घडविण्यासाठी वारकऱ्यांची संख्या घटविण्याला वारकऱ्यांचा विरोध आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या विश्‍वस्तांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत वारी वाहनातून जाणार असल्याने ज्येष्ठांच्या वयाची अट शिथिल करण्याची मागणी केली. राज्यातील इतरही वाऱ्यांत असाच मुद्दा पुढे येत असल्याने शासन स्तरावरच निर्णय अपेक्षित आहे. 

ज्येष्ठ विश्‍वस्तांत नाराजी

कोरोनामुळे यंदा पायी वारी निघाली नाही. वारकऱ्यांच्या गर्दीत संसर्ग टाळण्यासाठी यंदा वाहनातून मोजक्‍या वारकऱ्यांना घेऊन वारी काढण्याचे ठरले. त्यानुसार आता प्रत्यक्ष वारीच्या तयारीला सुरवात झाली असताना यात 65हून अधिक वयाच्या वारकऱ्यांच्या सहभागाला प्रशासनाने हरकत घेतली आहे. त्यावरून ज्येष्ठ विश्‍वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकला 20 वारकरी शिवशाही बसने जाणार आहेत. त्यात मानकरी, वारकरी, झेंडेकरी, पुजारी, दोन पोलिस, दोन वैद्यकीय अधिकारी आणि दहा विश्‍वस्तांचा समावेश असेल. मात्र विश्‍वस्तांत तीन ते चार विश्‍वस्त वयोवृद्ध आहेत. तीन जिल्ह्यांतून जाणाऱ्या वारीत जिल्हाबंदीच्या नियमात ज्येष्ठांना प्रतिबंध आहे. त्यामुळे ज्येष्ठांना प्रवासाला परवानगीसाठी शासन स्तरावरून निर्णय घ्यावा लागणार आहे. 

वैद्यकीय चाचणीसाठी धावाधाव 

राज्यात अनलॉक आहे. तसेच जिल्हाबंदीही उठलेली नाही. त्यामुळे तीन जिल्ह्यांतून जाणाऱ्या त्र्यंबकेश्‍वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीला नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रवासाच्या परवानगीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. यामुळे वारीतील सहभाग असलेल्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी धावाधाव सुरू आहे. 

खबरदारीचा भाग म्हणून पोलिस, रुग्णवाहिका, डॉक्‍टरांचे पथक वारीसोबत द्या; पण त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन देण्याऐवजी वारकऱ्यांच्या गाडीतच त्यांची मोजदाद कशी करता? वारीसाठी 20 वारकरी असावेत, पोलिस- वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र वाहन द्या, त्यांची वारीत मोजदाद नको. 
- पुंडलिकराव थेटे, पालखीप्रमुख, संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com