esakal | खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
sakal

बोलून बातमी शोधा

kuldeep.jpeg

मुलगा झाल्याची गोड बातमी मित्रांना सांगून रीतसर रजेवर निघालेल्या लष्करातील जवान व पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील वीरपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडियावर झळकताच बागलाण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

sakal_logo
By
अंबादास देवरे

सटाणा (नाशिक) : आठ दिवसांपूर्वीच मुलगा झाल्याने बापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. झटपट सुट्टीचा अर्ज करु गावी जाण्याची तयारी सुरु होती. मात्र नियतीचा खेळ तर बघा. बाळाला बघायच्या आधीच त्यांनी सोडला जीव. घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. वाचा काय घडले नेमके?

झोपेतच झाला मृत्यू

पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील रहिवासी व सध्या भाक्षी रोड, सटाणा येथे वास्तव्यास असलेले सैन्य दलातील जवान कुलदीप नंदकिशोर जाधव यांचा जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर ड्यूटीवर असताना मृत्यू झाला. कुलदीप जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात कार्यरत असून, जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते. या भागात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने प्रशासनाला दिली आहे.

मुलाला पाहण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच

लष्करात भरती झालेल्या कुलदीपचा १५ नोव्हेंबर २०१७ ला किकवारी (ता. बागलाण) येथील नीलमशी विवाह झाला. विवाहानंतर तीन वर्षांनी कुलदीपला ‘कुलदीपक’ झाला. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी कुटुंबात बाळाचे आगमन झाल्यामुळे जाधव कुटुंबाची दिवाळी अधिकच उजळून निघाली. पुत्ररत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी कुलदीपलाही दिली. बाप झाल्याची खूशखबर त्याने मित्रांना सांगितली व लवकरच मी बाळाच्या भेटीला येईल म्हणून कुटुंबीयांनाही कळविले. शुक्रवारपासून कुलदीप सुटीवर निघाला. कारगिल सेक्टरमध्ये आपल्या ‘कुलदीपक’ला भेटण्याचे स्वप्न पाहत कुलदीप झोपी गेला तो कायमचाच, हे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र आपल्या ‘कुलदीपक’ची भेट न घेताच त्याने जगाचा निरोप घेतला. 

हेही वाचा >  मध्यरात्री रस्त्याजवळ अज्ञातांनी आणला शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसरात खळबळ

मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कारगीलमध्ये मृत्यू झालेल्या बागलाणच्या कुलदीपचे पार्थिव सोमवारी (ता.२३) श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात येणार आहे. तेथे रात्री बाराच्या दरम्यान लष्कराकडून शहीद कुलदीपला मानवंदना दिली जाईल. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) सकाळी आठपर्यंत पिंगळवाडे येथे कुलदीपच्या राहत्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, गावाच्या स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा > निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख

go to top