esakal | ‘किसान रेल’ शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी? भाड्यातील सवलतीमुळे ग्राहक मिळणे झाले मुश्‍कील 
sakal

बोलून बातमी शोधा

kisan rail 4.jpg

‘किसान रेल’मधून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून माल मोठ्या प्रमाणात पाठविला जात असल्याने ही रेल्वे शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी, असा प्रश्‍न तयार झालाय.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ‘किसान रेल’ची घोषणा केली होती.

‘किसान रेल’ शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी? भाड्यातील सवलतीमुळे ग्राहक मिळणे झाले मुश्‍कील 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक व्हावी म्हणून केंद्र सरकारने देशात किसान रेल सुरू केली. पालेभाज्या, फळांच्या वाहतुकीवर रेल्वेकडून सरसकट ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल’ अंतर्गत अधिसूचित फळे-भाजीपाल्याच्या वाहतुकीवर ५० टक्के सवलत दिलीय. कृषी कायद्याच्या अनुषंगाने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांसाठीच्या रेल्वेचा आवर्जून उल्लेख केंद्र सरकार करत आहे.

आधीच ‘बुकिंग’ करून घेण्याची सूचना

पण मुळातच, ‘किसान रेल’मधून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून माल मोठ्या प्रमाणात पाठविला जात असल्याने ही रेल्वे शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी, असा प्रश्‍न तयार झालाय.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ‘किसान रेल’ची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ७ ऑगस्ट २०१८ ला देवळाली (नाशिक) ते दानापूर (बिहार) ही ‘किसान रेल’ सुरू झाली. त्यामुळे फळे, भाजीपाला, फुले, कांदा उत्पादकांना मोठा फायदा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठीच्या ‘किसान रेल’च्या अनुषंगाने विशेष संकेतस्थळावरून शेतकऱ्यांकडून आधीच ‘बुकिंग’ करून घेण्याची सूचना नागपूरमध्ये केली होती.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

‘किसान रेल’च्या भाड्याच्या सवलतीचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची बाब

देशभरात ‘किसान रेल’ योजनेचा विस्तार करण्यात आला. पैठणीनगरी येवल्यातील नगरसूल (जि. नाशिक) स्थानकातून पहिली ‘किसान रेल’ २२ वॅगनमधून ५२२ टन कांदा घेऊन ५० तासांत गुवाहाटीला पोचली. त्यानंतर तेवढाच कांदा चितपूर (कोलकता)कडे रवाना झाला. तिसरी ‘किसान रेल’ गुवाहाटीकडे जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार यापुढील काळात आणखी ३३ ‘किसान रेल’चे ‘बुकिंग’ झाले आहे. पण एकूण रेल्वेच्या ५० टक्के भाडे सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्याच्या तक्रारींना तोंड फुटले आहे. एवढेच नव्हे, तर भाड्याच्या सवलतीचा फायदा घेत देशांतर्गत शेतमाल पाठविला जात असल्याने ट्रकने अधिकचे भाडे मोजून शेतमाल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांना अधिक भावाचे ग्राहक मिळणे मुश्‍कील झाले आहे. व्यापाराच्या स्पर्धेतून ‘किसान रेल’च्या भाड्याच्या सवलतीचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची बाब ऐरणीवर आली आहे. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच
१४-१‘बुकिंग’मधून पैसे मिळविण्याचा नवा धंदा 
‘किसान रेल’च्या ‘बुकिंग’मधून पैसे मिळविण्याचा नवा धंदा उदयास आल्याचे गाऱ्हाणे व्यापारी मांडू लागले आहेत. गुवाहाटीकडे कांदा रेल्वेने पाठविण्यासाठी क्विंटलला ६२० रुपये भाडे आकारले जाते. ‘किसान रेल’साठी क्विंटलला ३१० रुपये भाडे द्यावे लागते. प्रत्यक्षात मात्र ‘किसान रेल’ने माल पाठविण्यासाठी क्विंटलला ३५० रुपये भाड्याचा भाव फुटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एका व्यापाऱ्याकडून मिळालेली माहिती आणखी धक्कादायक आहे. ट्रकने कांदा पाठविण्यासाठी एक लाख ८० हजार रुपये भाडे मोजावे लागते. त्यावर उपाय म्हणून ‘किसान रेल’ने माल पाठविण्यासाठी चौकशी केल्यावर पहिल्यांदा सव्वा लाख रुपये भाड्याची मागणी करण्यात आली. हा व्यवहार होत नाही म्हटल्यावर एक लाख रुपये भाड्याची ‘ऑफर’ मिळाली. याच व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ट्रकने अधिक भाड्याने माल देशांतर्गत पाठवितो आणि ‘किसान रेल’चा फायदा उठवत भाड्याची सवलत घेतली जात असेल, तर आमचा माल कोण घेणार, हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे शेतमाल ‘किसान रेल’ने जाण्याची सोय झाल्याने बाजारपेठेत चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो हा केला जाणारा दावा कितपत खरा आहे याचा शोध घ्यावा लागेल, असेही त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहतुकीच्या व्यापारातून ३ टक्क्यांपर्यंत पैसे मिळविणे समजण्यासारखे आहे, परंतु १० ते १२ टक्क्यांपर्यंत व्यापार करणे यातून शेतकऱ्यांचा काय फायदा होणार हे समर्थनीय कसे, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. 

‘किसान रेल’च्या भाड्यातील सवलतीचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला हवा. भाडे सवलतीच्या यादीत द्राक्षांचा समावेश करावा, अशी मागणी आपण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रेल्वेभाड्याच्या सवलतीचा फायदा होणार नसेल, तर काय उपयोग? शेतकऱ्यांनी भाड्याच्या सवलतीचा फायदा करून घ्यावा. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतमाल देशांतर्गत बाजारपेठेत जात असला, तरीही भाड्याची सवलत थेट शेतकऱ्यांना देण्यासंबंधाने केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. -डॉ. भारती पवार, खासदार, भाजप 


संसदेच्या अधिवेशनात ‘किसान रेल’च्या भाड्याच्या सवलतीचा फायदा थेट शेतकऱ्यांना व्हावा, अशी मागणी आपण करणार आहोत. व्यापारी शेतमाल विकत घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे शेतकऱ्यांची माहिती असते. म्हणूनच ‘किसान रेल’ भाड्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा व्हायला हवी. 
-हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना 


‘किसान रेल’ शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी माल व्यापाऱ्यांमार्फत पाठवितात. शेतकऱ्यांचा माल विकला जावा, यासाठी व्यापारी शेतमाल परराज्यात पाठवितात. -जीवन चौधरी, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, भुसावळ विभागग